जळगाव ‘गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
19
  • जिल्ह्यातील विविध विकासकामांचा राज्यपालांकडून आढावा

जळगाव, दि. ९ (जिमाका): जळगाव जिल्हा सोन्याच्या व्यवसायात अग्रेसर आहे. त्यासाठी गोल्ड क्लस्टर’ करण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार स्मिता वाघ, आमदार  शिरीष चौधरी , सुरेश भोळे, लता सोनावणे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, उपवन संरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक आर. एस. लोखंडे, अधिक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे मंडळ, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी, महाजनको प्रकल्प मुख्य अभियंता शशांक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनवणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणाले की, जिल्ह्याच्या अविकसित भागाच्या विकासावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: जलसिंचन प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, जिथे तांत्रिक अडचणी असतील त्यातून मार्ग काढावा. राष्ट्रीय महामार्गाच्या 18 किलोमीटरचे रखडलेले काम विशेष बाब म्हणून पूर्ण करावे. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी विमान वाहतूक महत्त्वाची असून मुंबईसाठी दररोज विमान सुरु करण्याचा प्रयत्न करावा. तसेच इथल्या लोकांच्या मागणीप्रमाणे अहमदाबाद येथे विमान सेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करावा.

अटल भूजल योजनेंतर्गत अधिकाधिक पावसाचे पाणी जमिनीत मुरेल यासाठी पाण्याचा अपव्यय टाळून योग्य ते व्यवस्थापन होणे गरजेचे असून पाण्याचे तात्पुरते स्त्रोत निर्माण न करता ते अधिक टिकाऊ असण्यावर भर द्यावा.

यावेळी जिल्ह्यातील अमृत प्रकल्प, कुसुम सोलार पंप योजना, जलजीवन मिशन, मनरेगा, आवास योजना, जिल्ह्यातील शाळा, आरोग्य योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सखी वन स्टॉप सेंटर, आहार योजना, पेसा, पीएम जनमन अभियान, अद्यावत वस्तू आणि सेवाकर  यासह जिल्ह्यातील विविध योजनांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राज्यपालांसमोर सादरीकरण केले.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here