छत्रपती संभाजीनगर, दि.१५ (जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा इतिहास दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातून मांडण्याचा केंद्रीय संचार ब्युरोचा प्रयत्न वाखाणण्यासारखा आहे. मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामाचा हा संघर्ष, त्याग आणि बलिदानाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत अशा उपक्रमांद्वारे पोहोचवावा, असे आवाहन गृहनिर्माण, इतर मागास वर्ग विकास मंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, छत्रपती संभाजीनगर आणि महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित तीन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शनाचे आयोजन सिद्धार्थ गार्डन येथे करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मंत्री श्री. सावे, खासदार डॉ. भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड, सिद्धार्थ गार्डन उद्यान अधिकारी विजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यपक डॉ. मंगला बोरकर, महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद, साईसेवा बहुविध प्रतिष्ठान व राजमाता जिजाऊ विद्यालय व महाविद्यालयचे अध्यक्ष साईनाथ जाधव व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावे म्हणाले की, स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे आदर्श घेऊन तरुण आपले कार्य करतील. भारतीय स्वातंत्र्य लढा व मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्याची अत्यंत संक्षिप्त स्वरूपात व दुर्मिळ अशा छायाचित्राच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देण्याचे आवाहनही मंत्री श्री. सावे यांनी केले.
जिल्हाधिकारी यांनी यावेळी या मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती व इतिहास या विष मौलिक माहिती दिली. तरुणांनी या मुक्तिसंग्रामाची गाथा जाणून घेऊन त्यापासून प्रेरणा घ्यावी,असे आवाहन केले.
शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच, छत्रपती संभाजीनगर यांनी स्वातंत्र्य लढ्यातील पोवाडे व गीतांचे सादरीकरण केले. हे प्रदर्शन दि. १७ पर्यंत दररोज सकाळी ९ ते सायं. ६ वा. पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. प्रसिध्दी अधिकारी माधव जायभाये यांनी प्रास्ताविक केले. सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी प्रदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले.
०००