छत्रपती संभाजीनगर, दि.१५ (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित केले आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित करीत असल्याचे घोषित केले.
मंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते सरबत घेऊन त्यांनी आपले उपोषण थांबवले. १४ दिवसानंतर हे उपोषण त्यांनी स्थगित केले. येथील क्रांती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे उपोषण सुरु होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तसेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह आज सायंकाळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषण स्थळी जाऊन श्रीमती उंबरे यांची भेट घेतली.
मंत्री श्री.केसरकर यांनी श्रीमती उंबरे यांच्या मागण्यानिहाय प्रत्येक मुद्यावर सविस्तर चर्चा करुन श्रीमती उंबरे यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे शंकानिरसन केले. त्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत माहिती दिली. यावेळी मराठा समाजाचे कार्यकर्ते तसेच सर्व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. चर्चेनंतर श्रीमती उंबरे यांनी आपण उपोषण स्थगित करीत असल्याचे स्वतः माध्यमांना सांगितले.
०००