‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’साठी राज्यात सहा लाखांहून अधिक अर्ज पात्र

0
2429

मुंबई, दि. १६ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेकरिता राज्यात ६ लाख २५ हजार १३९ अर्ज पात्र झाले आहेत.

राज्यात मुंबई विभागात ६३ हजार ९०, नाशिक विभागात १ लाख १२ हजार ७६१, पुणे विभागात ९१ हजार ६२५, अमरावती विभागात १ लाख ३२ हजार ७५८, नागपूर विभागात १ लाख १० हजार ४५५, छत्रपती संभाजीनगर विभागात ४२ हजार ९७६ लातूर विभागात ७१ हजार ४७४ अर्ज पात्र झाले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने /उपकरणे खरेदीसाठी तसेच त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता या योजनेच्या माध्यमातून ३ हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील, त्यामध्ये चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश असून राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र / प्रशिक्षण केंद्र येथे त्यांना सहभागी होता येणार आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्ह्यांच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

शैलजा पाटील/विसंअ/

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here