नागपूर, दि. १६ : नागपूर येथील राजभवनातील मुख्य बैठक सभागृह. एरवी सतत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकांनी गजबजलेल्या या वातावरणात वरुड येथील 15 युवकांच्या टिमला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ‘राष्ट्राप्रती सतत प्रामाणिक राहून शक्य तेवढे योगदान देण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी निर्माण होत आहेत. प्रत्येकाने आपला निश्चय पक्का केला की, निर्धारित लक्ष्य-ध्येय गाठणे सोपे होते. स्वत:वर विश्वास ठेवा, सचोटी आणि प्रमाणिकतेला सतत प्राधान्य द्या’ असा मौलीक सल्ला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी या युवकांना दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक युवक हताश झाले होते. त्यांच्या मनातील या कोंडीला वाट मिळावी, या दृष्टीने 2021 मध्ये वरुडच्या पोलीस स्टेशनद्वारे एक अनोखा प्रयोग केला गेला. तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच स्पर्धा परीक्षेचे एक लहान ग्रंथालय सुरु केले. यात स्थानिक डॉ. मनोहर आंडे, प्रा. किशोर तडस, तारेश देशमुख, नितीन खेरडे यांनी आपला वेळ दिला.
जागेच्या उपलब्धतेनुसार अवघ्या तीस विद्यार्थ्यांची इथे सोय करणे शक्य झाले. यातील २० विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षा व इतर निवडणूक प्रक्रियेतून शासकीय सेवेस पात्र झाले. या वीस मुलांपैकी सुमारे पंधरा युवकांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन पोलीस विभागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
‘आम्ही दोघेही शिक्षणानंतर होमगार्डमध्ये सहभागी झालो. नोकरीची नितांत आवश्यकता होती. कोरोनाच्या काळात सारेच डळमळीत झाल्याने आम्ही निराशेच्या वाटेवर केव्हा गेलो ते लक्षातही आले नाही. अशा काळात पोलीस स्टेशनमधील ग्रंथालयाने आम्हाला मोठा दिलासा मिळाला. त्यावेळेस परीक्षाविधीन कालावधीत लोढा यांनी आमचा विश्वास द्विगुणित केला. पहिल्याच प्रयत्नात पोलीस विभागात पोलीस व्हायचे आमचे स्वप्न साकार झाले’ असे कॉन्स्टेबल धिरज तेटू व दीप गुढदे यांनी सांगितले.
वरुड येथील डॉ. आंडे, प्रा. तडस व गावातील इतर व्यक्तींनी वरुड पोलीस स्टेशनच्या सहाय्याने हा उपक्रम आजही सुरु ठेवला आहे. योगायोगाने ज्यांनी हा साकारण्यात महत्त्वाची भूमिका निभावली ते तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा हे आता राज्यपालांचे परिसहाय्यक आहेत.