विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करावी – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना

मुंबई, दि. 19 : विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून येण्यासाठी शासनाने निर्गमित केलेला निधी सर्व प्रक्रिया पूर्ण करून वितरित करण्यात यावा, अशा सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या.

विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत व त्यांना आर्थिक मदत करण्याबाबत आयोजित बैठकीत कृषी मंत्री श्री. मुंडे बोलत होते.

संत्रा व मोसंबी उत्पादक बागायतदार शेतकरी यांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईचा प्रस्ताव नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाला पाठवला आहे. यासंदर्भात लवकरात लवकर मदत वितरित करण्याच्या सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मदत व पुनर्वसन विभागास केल्या, त्याचबरोबर मॅग्नेट प्रकल्पांतर्गत संत्रा पिकासाठी करण्यात येत असलेल्या कामांचा आढावा घेऊन गती देण्याच्या सूचना केल्या. बांगलादेश येथे महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या संत्र्याकरिता आयात शुल्काच्या 50% प्रमाणे शासन अनुदान देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याची सूचना केली

बैठकीस आमदार देवेंद्र भुयार, माजी आमदार आशिष देशमुख, पणन महामंडळाचे संचालक चरण सिंह ठाकुर, नरखेड येथील सभापती नरेश आरसडे, अशोकराव धोटे तसेच कृषी विभागाच्या  सचिव जयश्री भोज, कृषी संचालक विनयकुमार आवटे, यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/