नाशिक, दि. २१ (जिमाका): नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकास कामे प्राधान्याने केली जातील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते आज येवला तालुक्यातील सावरगाव, खिर्डीसाठे, नगरसुल, धामणगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अभियंता किरण जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुलदीप बागल,नायब तहसीलदार विवेक चांदवडकर, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, सरपंच लंकाबाई मुंढे, मंदाकिनी पाटील,चंद्रकला ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, आज भूमिपूजन झालेली कामे जलद गतीने सुरू करून दर्जेदार केली जातील. रस्त्यांची कामेही येत्या सहा महिन्याच्या पूर्ण केली जाणार आहेत. तालुक्यातील ममदापूर येथील बंधाऱ्याच्या कामास वनविभागाकडून मंजूर मिळाली असून आठवडाभरात या कामाचे भूमिपूजन होऊन काम सुरू होईल. खिर्डीसाठे येथील पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा असून डोंगरगाव पोहोच कालव्यातून पोटचारीद्वारे पाणी आणण्यासाठी याबाबत अधिकारी यांना पाहणी व अभ्यास करावयास सांगून हा प्रश्न सोडवला जाईल. राजापूर व ४१ गांवे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगाव १७ गावे व 38 गांवे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे येणाऱ्या काळात प्रत्येक गावात पाणी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री भुजबळ पुढे म्हणाले की, येवला तालुक्यात साडे चार एकर क्षेत्रात शिवसृष्टी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. उद्या 22 सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला जाऊन या पुतळ्याची अंगणगाव येथून मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीस नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच 2 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी केले.
या कामांचे झाले भूमिपूजन व लोकार्पण
सावरगाव
१.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत राममा ०८ ते अनकुटे, कुसुर रेल्वे स्टेशन रस्ता, लांबी ५.२०० किमी रस्त्याचे भूमिपूजन (र.रु.५०२.०३ लक्ष)
२. आमदार स्थानिक विकास निधीतून सावगाव बस थांबाचे लोकार्पण
खिर्डीसाठे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत नगरसुल ते खिर्डीसाठे रस्ता , लांबी ७.२०० किमी रस्त्याचे भूमिपूजन (र.रु.७७७.२७ लक्ष)
नगरसूल
१.पुरवणी अर्थसंकल्प अंतर्गत अनकाई कुसमाडी नगरसूल अंदरसूल पिंपळगांव जलाल रोड रामा ४५१ किमी ४०/०० ते ४५/०० ची सुधारणा करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.५०० लक्ष)
२.ग्रामीण रुग्णालय नगरसूल निवासस्थाने दुरुस्ती कामाचे भूमिपूजन (र.रु.३०० लक्ष)
धामणगाव
१.मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-२ (बॅच १) संशोधन व विकास अंतर्गत रा म मा ०२ ते धामणगाव रस्ता , लांबी ३.३९० किमी रस्त्याचे भूमिपूजन (र.रु.३६८.६० लक्ष)
२.महादेववाडी रस्ता सुधारणा करणे कामाचे भूमिपूजन (र.रु.३० लक्ष)
३.पालखेड डावा कालवा धामणे नाला एस्केप गेट चे भूमिपूजन करणे (र.रु.१० लक्ष)
०००