आवलकोंडा येथील बुद्ध विहाराचे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
41

लातूर, दि. 23 : गेल्या पाच वर्षांत उदगीर आणि जळकोट तालुक्यात सर्व समाज घटकांना सोबत घेवून विकास कामांना प्राधान्य दिले. जवळपास सहा ते साडेसहा हजार कोटी रूपये निधीची विकास कामे मंजूर करून पायाभूत सुविधांच्या निर्मितीला गती दिली. तसेच उदगीर एमआयडीसीला मंजूरी मिळाल्याने स्थानिक युवकांना लवकरच रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर तालुक्यातील आवलकोंडा येथील सारनाथ बुद्ध विहाराच्या भूमिपूजन प्रसंगी बनसोडे बोलत होते. उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी प्रवीण सुरडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य श्याम डावळे, सरपंच राहूल कांबळे, उपसरपंच विपूल सुडे, पंचायत समितीचे माजी सदस्य रघुनाथ सुडे, बालाजी भोसले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवलकोंडा येथील बुद्ध विहारासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हे विहार संस्कार केंद्र म्हणून ओळखले जावे. गुलबर्गा येथील बुद्ध विहाराप्रमाणे उदगीर शहरातील तळवेस येथे भव्य बुध्द विहार उभारण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. उदगीर शहरात मराठा भवन बांधकामासाठी जवळपास दहा कोटी रुपये, वीरशैव लिंगायत भवन बांधकामासाठी सुमारे साडेसात कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. यासोबतच रेड्डी भवन, रेणुकाचार्य भवन, ऊर्दू भवन बांधकामासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उभारणी सुरू आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेवून या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे बनसोडे यांनी सांगितले.

उदगीर येथे एमआयडीसी मंजूर झाली असून लवकरच याठिकाणी उद्योग आणून स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उदगीर मतदारसंघातील सिंचन सुविधा, रस्ते विकास, आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, प्रशासकीय इमारतींची उभारणी यासारख्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सुमारे सहा ते साडेसहा हजार कोटी निधीची विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत, असे मंत्री बनसोडे म्हणाले.

राज्य शासनाच्यावतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यासोबतच महिलांनी दरवर्षी मोफत तीन घरगुती गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेतून साडेसात एचपीपर्यंतच्या वीज पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. वयोवृद्ध नागरिकांना विविध तीर्थ स्थळांचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आल्याचे बनसोडे यांनी सांगितले.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कुदळ मारून बुद्ध विहाराच्या कामाचे भूमिपूजन केले. जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा. श्याम डावळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कु. भिमांजली गायकवाड यांनी केले.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here