डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा उद्या वार्षिक दीक्षान्त समारंभ

मुंबई,दि.22:- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ सोमवार 23 सप्टेंबर 2024 रोजी  सकाळी 11.00 वाजता मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात होणार आहे.

विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत उपस्थित  राहणार असून  नागपूर येथील भारतीय प्रबंध संस्थानचे संचालक डॉ. भीमराया मेत्री हे दीक्षान्त भाषण करणार आहेत.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या या दीक्षान्त समारंभात 11 विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली जाणार आहे. यात विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यूट्युब व फेसबुक चॅनेलवर केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास पाध्ये यांनी दिली.

00000