नाशिक, दिनांक 25 सप्टेंबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : मातोश्री मुलींच्या वसतिगृहात जुलै 2024 पासून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या विद्यार्थिंनीना वसतिगृहात आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रो.ह.यो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.
मातोश्री मुलींचे वसतिगृह भेट तसेच प्रवेश इत्यादीबाबत आढावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सारधीचे उपसंचालक सुधीर खांदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक जी. व्ही. गर्जे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, सारथीचे संशोधन अधिकारी सुनील दंडगव्हाळ, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पाटील, महाज्योतीच्या प्रादेशिक समन्वयक सुवर्णा पगार, गृहपाल अजिता शिंदे, कृषी अधिकारी प्रियांका जगताप, प्रकल्प अधिकारी प्रथमेश गायकवाड यांच्यासह मातोश्री वसतिगृहातील विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
पालकमंत्री श्री.भुसे म्हणाले की, नाशिक शहरात ग्रामीण भागातून मुली शिक्षणासाठी येतात. मातोश्री वसतिगृहात 200 विद्यार्थिंनीची प्रवेशाची क्षमता असून 109 विद्यार्थिनी आतापर्यंत प्रवेशित झाल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी आलेल्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून रिक्त जागांवर प्रवेश देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींची सुरक्षा ही महत्वाची बाब असून त्यात कोणतीही हयगय वा कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने वसतिगृहाचा परिसर स्वच्छ ठेवावा.
मुलींना शिक्षणासाठी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. चांगले अध्ययन करून यशाचे उच्च शिखर गाठावे, आपल्या आई-वडिलांच्या नावासह नाशिकचे नावही उज्ज्वल करा अशा शब्दात पालकमंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थींनीना शुभेच्छा दिल्या. यावेळी सारथीच कडून प्रवेशित मधुरा खताळे, मयुरी ढोके, महाज्योतीकडून प्रवेशित पल्लवी ढोमसे, कविता माळी व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित आरती वाघेरे, श्रद्ध रहाणे या विद्यार्थिंनीना प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह प्रवेशपत्र देण्यात आले.
यांनतर मातोश्री वसतिगृहातील अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री श्री.भुसे यांनी बैठक घेतली. या बैठकीत वसतिगृहातील प्रवेश,आवश्यक सुविधा व अडचणी याबाबत चर्चा झाली. वसतिगृहात विद्यार्थिंनींना आवश्यक असलेले जीम साहित्य, ग्रीन जीम, क्रीडांगण, संगणक संच, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दूरदर्शन संच आदी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री श्री. भुसे यांनी आश्वासित केले. तसेच मुलींना चांगल्या प्रतीची भोजनाची व्यवस्था ठेवावी त्यासोबतच वसतिगृहातील नियमांची अमंलबजावणीबाबत सूचनाही दिल्या. वसतिगृहातील कार्यालय, गृहपाल निवास, ग्रंथालय, भोजन कक्ष, करमणूक कक्ष, संगणक कक्ष यांची पाहणी पालकमंत्री श्री.भुसे यांनी केली.
0000