मुंबई, दि. 25 : उद्योग, पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. राज्यात सेमी कंडक्टर तसेच इतर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. उद्योगांना मिळणारी सुविधा, पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र हे उद्योगस्नेही राज्य बनल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह 2024 मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे सहभागी झाले होते. यावेळी इंडिया टुडेचे संपादक राजदीप सरदेसाई व कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची विविध विषयांवर मुलाखत घेतली.
दावोसमध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली. याशिवाय सौर ऊर्जा, सेमी कंडक्टर आदी क्षेत्रात राज्यात गुंतवणूक वाढत आहे. नुकतेच नवी मुंबईत सेमी कंडक्टरचा प्रकल्प सुरू झाला आहे. उद्योजकांचा विश्वास वाढल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण झाल्या आहेत. अटल सेतू, सागरी किनारा मार्ग यामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला. मेट्रोचे जाळे विणले जात असून लवकरच मेट्रो 3 या भूमिगत मेट्रोचा शुभारंभ होणार आहे. यातून रोज सुमारे 13 लाख नागरिक प्रवास करतील. वाढवण बंदर महाराष्ट्राचा कायापालट करणारा प्रकल्प आहे. वाढवण येथे विमानतळ सुरू करण्याचाही विचार आहे. नवी मुंबई विमानतळही लवकरच सुरू होणार आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार आहे. तसेच राज्यातील रस्तेही खड्डेमुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्यांचे शासन असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असून ही योजना पुढील काळातही सुरूच राहणार आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांचा हातभार लागणार आहे. या योजनांचा फायदा सर्वसामान्यांच्या कुटुंबियांना होणार आहे. शासन आपल्या दारी योजनेमुळे सुमारे पाच कोटी नागरिकांना फायदा झाला आहे.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात राज्यात पूर्ण क्षमतेने विकास होत आहे. ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी व मंत्रालयात येणाऱ्यांना भेटल्याशिवाय मी जात नाही. जनता हीच माझ्यासाठी ऊर्जा आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन असं समजून मी काम करतो. त्यामुळे सामान्य माणसाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी काम करत आहे.
राज्य व केंद्र शासन हे शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळतात. राज्य शासन त्यात आणखी सहा हजार देत आहे. तसेच एक रुपयात पीक विमाही राज्य शासन देत असून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.
बदलापूरमधील घटनेतील आरोपीच्या मृत्यूची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/