माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुर्भे येथे स्व.अण्णासाहेब पाटील यांची ९१ वी जयंती व गुणवंत कामगार पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

ठाणे दि.25(जिमाका) : माथाडी कामगार समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही. शासनाने नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. माथाडी कामगारांवर अन्याय करणारा कायदा आम्ही कधीही करणार नाही, असे उद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

स्व.अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतपेढी मर्यादित आणि स्व.अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी ग्राहक सोसायटी यांच्या वतीने नवी मुंबई तुर्भे येथे “स्व.अण्णासाहेब पाटील यांची 91 वी जयंती व गुणवंत कामगार पुरस्कार वितरण” समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे, आमदार प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार तथा स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, संदीप नाईक, सागर नाईक, स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे, महामंडळाचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिपक शिंदे, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियचे अध्यक्ष एकनाथ जाधव, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक अण्णासाहेब पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, या कार्यक्रमांच्या निमित्ताने स्व.अण्णासाहेब पाटील यांचे दर्शन घेता येते व माथाडी कामगाराशी संवाद साधता येतो. म्हणून या कार्यक्रमाला मी नियमित येत असतो. माथाडी कामगारांसाठी स्व.अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष केला. त्यावेळी कामगारांची पिळवणूक होत होती, तेव्हा स्व. अण्णासाहेब पाटील यांनी लढा उभा केला. त्यामुळे क्रांतीसूर्य स्व.अण्णासाहेब पाटील माथाडी कामगारांचे दैवत आहेत. माथाडी कामगारांनी आपल्या मेहनतीवर आपला संसार उभा केला आहे. या कामगारांचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. माथाडी कामगारांच्या अडचणी  दूर करण्यात येतील. माथाडी बांधवांचे नाशिक, वडाळा येथे निर्माण झालेले प्रश्न पुढील 15 दिवसात बैठक घेवून मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगार घरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार आहोत. प्रधान मंत्री आवास योजनेतून सुध्दा निकषात बसणाऱ्यांना हक्काची घरे देण्यात येतील. स्वराज्याचे  रक्षण व नेतृत्व करणाऱ्या समाजाला नोकरीमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी स्व.अण्णासाहेब पाटील यांनी त्यावेळी केली होती. मराठा समाज मागास आहे. या समाजाच्या उन्नतीसाठी स्व.अण्णासाहेब पाटील यांनी बलिदान दिले. मराठा समाजाची चळवळ स्व. अण्णासाहेब पाटील यांच्यामुळे उभी राहिली. मराठा आरक्षणाची मागणी कायद्याच्या चौकटीत बसवून मार्गी लावण्यासाठी शासनाचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाला जे आरक्षण दिले जाईल, ते न्यायालयात टिकणे महत्त्वाचे आहे. पोलीस भरतीत मराठा समाजाला उत्तम संधी मिळाली. मराठा समाजाचा शासकीय नोकरीत टक्का वाढावा म्हणून सारथीची निमिर्ती केली. सारथी च्या माध्यमातून मार्गदर्शन मिळालेले मराठा समाजातील विद्यार्थी 12 आयएएस, 18 आयपीएस तर 480 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाले आहे. आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख उद्योजक घडले आहे. त्यांना रु.8,400 कोटीं पेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले आहे. एखाद्या महामंडळाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योजक घडण्याचे हे विक्रमी प्रमाण आहे.

या महामंडळाचे नाव लवकरच “मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील” करण्यात येणार आहे. ज्या मराठा विद्यार्थ्यांना हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही त्यांना शासनाकडून महामंडळाच्या माध्यमातून रू.7000/- निर्वाह भत्ता दिला जातो. मुलींना शिक्षण मोफत दिले जाते. या माथाडी कामगारांना न्याय देण्याची वेळ येईल तेव्हा मी माथाडी कामगारांच्या बाजूने उभा असेन. माथाडी बांधवांचा पैसा गडप करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना माजी आमदार तथा स्व.अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या तसेच  महामंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामकाजाची माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी त्यांचा सत्कार केला. त्याचबरोबर गुणवंत माथाडी कामगारांना मानपत्र देवून उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

००००