सांगली, दि. 25, (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्याला अनेक क्षेत्रात वैभवशाली वारसा व गौरवशाली परंपरा आहे. हा वारसा, ही परंपरा वृद्धिंगत करण्यासाठी तसेच जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दर्जेदार पायाभूत सुविधांसाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केले.
शासकीय विश्रामगृह मिरज येथे आयोजित वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, उपवनसंरक्षक नीता कट्टे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर आदिंसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, जिल्ह्यात दर्जेदार पायाभूत सुविधा होण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आराखडा तयार केल्यास शासन स्तरावरून सहकार्य मिळवणे सोयीचे होईल. भौतिक विकासाबरोबर जनतेच्या आर्थिक विकासालाही चालना देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे ते म्हणाले. जिल्ह्याच्या विकासासाठी योग्य नियोजन आणि उत्तम पायाभूत सुविधांच्या विकासावरील लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा, प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी तंतुवाद्य देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत केले. तत्पूर्वी राज्यपाल महोदयांना पोलीस पथकाने मानवंदना दिली. यावेळी राष्ट्रगीत वादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगली जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती देणारे सादरीकरण केले. यामध्ये जिल्ह्याची लोकसंख्या, पर्जन्यमान, जिल्ह्याची ओळख, साक्षरता दर, ग्रामविकास, नागरी विकास, केंद्र व राज्य शासनाच्या आवास, आरोग्य, कृषि, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनांची अमृत योजना, घनकचरा व्यवस्थापन, मुद्रा, उज्ज्वला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आदि योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीची माहिती दिली. तद्नंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पोलीस विभागाच्या माहितीचे सादरीकरण केले. यामध्ये पोलीस दलातील मन्युष्यबळ, पायाभूत सुविधा, पोलीस कल्याण उपक्रम, प्रतिबंधात्मक उपाययोजना, निर्भया पथक आदिंची माहिती सादर करण्यात आली.