अत्याधुनिक उद्यान विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक येथे बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण

0
44

नाशिक, दि. २८ : नाशिक शहरात गोदावरी नदीच्या काठावर साडेसात एकर जागेत साकारण्यात आलेले उद्यान जागतिक दर्जाचे आहे. या उद्यानामुळे नागरिकांना विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण मिळाले आहे. या उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आधारित कार्यक्रमासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, आमदार संजय शिरसाट, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, या उद्यानात सर्व तरुण उद्योजकांसाठी उपयोगी सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आहे, ते उपयुक्त ठरेल. तसेच उत्तम कलादालन, साहसी खेळांचा येथे समावेश आहे. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे अभूतपूर्व होती. व्यंगचित्रे, छायाचित्रे श्री. बोरस्ते यांच्या प्रयत्नाने या उद्यानामध्ये पाहावयास मिळणार आहेत. विरंगुळ्यासाठी हक्काचे ठिकाण निर्माण करणे गरजेचे आहे. चांगले रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो आणि पायाभूत सुविधांबरोबरच उद्यानेही आवश्यक आहेत. धकाधकीच्या आयुष्यामध्ये  या उद्यानाच्या माध्यमातून क्षणभर विश्रांती उपलब्ध होणार आहे. या उद्यानात मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची झाडे आहेत. सर्वच बाबतीत हे उद्यान परिपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्य शासन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती साधत आहे. पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घेतली आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्य शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव भगूरमधील विविध विकास कामांसाठी शासनाने 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 15 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here