जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्य पूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई, दि. ३० : जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता मिळाली आहे. या योजनेमुळे ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. या निर्णयामुळे जामनेर तालुक्यातील 31 गावे, जळगाव तालुक्यातील 28 गावे आणि पाचोरा तालुक्यातील 16 गावे अशा एकूण 75 गावांना लाभ मिळणार आहे.

ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांच्या दूरदृष्टी आणि आणि विकासाभिमुख निर्णयामुळे या परिसरातील लोकांच्या जीवनमानात कमालीचा बदल होईल आणि हा भाग सुजलाम सुफलाम होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे भागपूर धरणापासून अजिंठा डोंगराच्या पायथ्यापर्यंत उपसा सिंचन योजनेतून जामनेर तालुक्यातील 31 गावांना लाभ होणार असून त्यातील 11 हजार 388 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

जळगाव तालुक्यातील 28 गावांना लाभ होणार असून 14 हजार 224 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.तर पाचोरा क्षेत्रातील 16 गावांना लाभ होणार असून 5152 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे असे ३० हजार ७६४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

या प्रकल्पाअंतर्गत जामनेर तालुक्यातील २३ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना व पाचोरा तालुक्यातील २६ लघु व मध्यम पाटबंधारे प्रकल्पांना पाणी पुरविण्यात येणार आहे. या प्रकल्पात गोलटेकडी ल.पा तलाव व एकुलती साठवण तलावाच्या कामाचा सुध्दा समावेश आहे.

*****

संध्या गरवारे/विसंअ/