डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून आढावा

0
43

मुंबई, दि. १ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांना उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी-सुविधांच्या पूर्वतयारीचा आढावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक श्री. आठवले यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत सपकाळे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सो. ना. बागुल, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे  तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले म्हणाले की, चैत्यभूमी येथे अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई महापालिका, गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग तसेच सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी. गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी.

चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना उच्च दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना मंत्री श्री. केसरकर यांनी दिल्या.

चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्ककडे येणारे रस्ते व त्यावरील वाहतुकीचे नियंत्रण, सुरक्षाव्यवस्था, अनुयायांकरीता पिण्याचे पाणी, शौचालय आदींची सुविधा, परिसर स्वच्छता, सीसीटीव्हीची व्यवस्था, विद्युतव्यवस्था, भोजन व्यवस्था, आरोग्य सुविधा याबाबत बैठकीत आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती यावेळी देण्यात आली.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here