मुंबई, दि. १ :- जल जीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यातील फलटण येथील ‘हर घर जल ‘ योजने साठी होणाऱ्या कामाचे सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
मंत्रालयात मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन अंतर्गत कामांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन, माजिप्रचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे यांच्यासह जल जीवन मिशन व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते.
पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, ‘हर घर जल’ अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या नवीन नळ जोडणीची तरतूद आहे. यामध्ये जुन्या नळ जोडणी बदलण्यास मान्यता नाही, अशी आवश्यकता भासल्यास यासाठी संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा परिषद मार्फत निधी तरतूद करून कार्यवाही करण्यात येते, असे पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून होणाऱ्या कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. तसेच पावसामुळे सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी अतिरिक्त उपाययोजना करण्याची गरज भासत आहे, या कामांच्या अनुषंगाने वाढ होत असलेल्या खर्चाच्या मागणीसह प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले. पुढील तरतुदीची नियोजन व वित्त विभागाने गतीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले.
0000
किरण वाघ/विसंअ/