मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना
चंद्रपूर,दि. ०२ : वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छीमार समाजाला दिलेला शब्द पाळला आहे. मच्छीमार बांधवांच्या उद्धारासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करणार असल्याची ग्वाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली होती. त्यानुसार रविवार, दि. ३० सप्टेंबरला मुंबई येथे बैठकीत त्यांनी नवीन भूजल महामंडळ तात्काळ स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. यासोबतच मासेमारी संस्थेच्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे बैठक घेण्यात आली. यावेळी मत्स्य विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मत्सव्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे, महाराष्ट्र राज्य उपसचिव कि. म. जकाते, महाराष्ट्र राज्य मत्स्यउद्योग विकास धोरण समिती सदस्य अॅड. अमोल बावणे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू गौरकार,प्रतिनिधी अमित चवले, रमेश सोनवणे, संस्थेचे प्रतिनिधी जितू टिंगूसले यांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या तसेच माजी मालगुजारी तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या तलावांमधून मत्स्यबीज व मासे वाहून गेले. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाल्याची जाणीव शासनाला आहे. त्यामुळे मच्छिमार बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी म्हटले होते. त्यानुसार प्रशासनाला महामंडळ स्थापन करण्याचे आदेश ना. मुनगंटीवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मच्छिमार समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या आदेशांनंतर महाराष्ट्रातील भूजल जलाशयातील मासेमारी समाज यांच्या विकासाकरिता नवीन भूजल कल्याणकारी महामंडळ तात्काळ स्थापन करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महामंडळाचे कार्यालय नागपुरात
महाराष्ट्रमध्ये सर्वाधिक मासेमारी करणारा मच्छिमार समाज व त्यांच्या संस्थांच्या विकासाच्या उद्देशाने भूजल महामंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. महामंडळ स्थापन झाल्यावर त्याचे कार्यालय नागपूर येथे असावे, अशी मागणी होती. त्याचा विचार करून मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी नागपूरला कार्यालय ठेवण्याच्या सूचना केल्या. सर्वाधिक भूजल संस्था या विदर्भात असल्यामुळे भूजल जलाशयातील महामंडळाचे कार्यालय नागपुरात असणे आवश्यक आहे, त्यांनी म्हटले.
म्हणून महामंडळाची स्थापना
भूजल महामंडळ स्थापन झाल्यास भूजल जलाशयातील संस्था व मासेमारी करणारा समाज यांचा सर्वांगीण विकास होणार आहे, याची जाणीव श्री. मुनगंटीवार यांना आहे. त्याचदृष्टीने त्यांनी मासेमारी करणारा समाज व मत्स्य सोसायटी यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक तसेच व्यवसायिक जीवनमान उंचावण्यासाठी या महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मानले आभार
मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे भूजल जलाशयातील मासेमारी समाजात आनंदाचे वातावरण आहे. मासेमारी समाजाकडून मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. तसेच समाजाकडून त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत.
बोटुकली खरेदीसाठी आर्थिक मदत
मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर मासेमारी संस्थेला प्रति हेक्टर १५०० किलो मत्स्य उत्पादन करणे अनिवार्य असल्याची अट रद्द करण्यात आली आहे. ‘बोटूकली’चे अनुदान लवकरात लवकर संस्थेच्या खात्यात देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे श्री. मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी शासनाकडून बोटूकली (मत्स्यबीज) खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. यासोबतच नायलॉन सूत जाळे, डोंगे यांचे अनुदान सभासदांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात येणार आहे.
कर्जमाफीचा प्रस्ताव
मासेमारी संस्थेवर असणाऱ्या कर्जमाफीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. जुलै २०२४ मध्ये अतीवृष्टीमुळे मासेमारी सहकारी संस्थांना झालेल्या नुकसान भरपाईबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
०००