जिल्ह्याच्या विकासात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोलाचे योगदान – उपमुख्यमंत्री अजित पवार

बँकेचा अमृत महोत्सव सांगता सोहळा

सातारा, दि. (जिमाका) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा जिल्ह्याच्या आर्थिक, समाजिक, कृषी व शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान आहे. या बँकेचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, यासाठी विविध योजना राबवाव्यात. या योजना राबविण्यासाठी शासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अमृत महोत्सव सांगता सोहळा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर पार पडला त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार बोलत होते. या सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार तथा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आमदार सर्वश्री रामराजे नाईक-निंबाळकर, बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले, दीपक चव्हाण, बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कामगिरी राज्यात अव्वल आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या बँकेला शंभरहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहे. स्थापनेपासून बँकेची देदिप्यमान प्रगती आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकारच्या एसएमपी दराबाबतच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळणार आहे. शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तीपर्यंत मोफत वीज देण्याच्या निर्णयाबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना 7 रुपये ज्यादा अनुदान देण्याचाही निर्णय घेतला आहे.

राज्यात सौर ऊर्जेवर साडेनऊ हजार मॅगावॅट वीज निर्मिती करण्यात येणार आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील उपसासिंचन योजना टप्प्याटप्प्याने सौर ऊर्जेवर करण्यात येणार आहे. याचा लाभ सातारा जिल्ह्यालाही होणार आहे. राज्याच्या विकासात सहकाराचा मोलाचा वाटा आहे. पुढील काळातही सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्थापनेपासून आर्थिक शिस्त पाळली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, बँकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. कोणतेही राजकारण न करता मोठा व्यवसाय निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

बँकेचे अध्यक्ष आणि खासदार श्री. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेडून अनेक योजना राबविण्यात येत आहे. बँकेच्या एकूण 319 शाखा आहेत. जिल्ह्यामध्ये सहकारी साखर कारखाने उभारण्यासाठी बँकेने सहकार्य केले आहे. अनेक योजनांच्या माध्यमातून सामाजिक कामेही केली जात असल्याचे यांनी सांगितले.

आमदार नाईक-निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गौरवशाली परंपरा आहे. कर्जफेडीचे संस्कार महत्त्वाचे आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता आणि बॅकिंग क्षेत्र यांची सांगड घातली पाहिजे, असे ही त्यांनी सांगतले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रीक यांच्यासह बँकेचे संचालक, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००