आंबिया बहार सन २०२४-२५ फळ पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

0
77

मुंबई दि.३ : पुनर्रचित हवामान आधारित ‘फळ पीक विमा योजना’ आंबिया बहार सन 2024-25 मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या 9 फळपिकासाठी 30 जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी सहभाग ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होणेबाबत अथवा न होणेबाबत घोषणापत्र ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते/ किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे जमा करणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर बँकेला देणे आवश्यक आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. तसेच कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता विहित नमुन्यातील घोषणापत्र संबंधित बँकेत सादर करणे आवश्यक राहिल. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बॅंकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस  नोंदणीकृत भाडेकरार अनिवार्य आहे. या योजनेत राज्यात ‍प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागाकरीता एका फळपीकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 10 गुंठे (0.10 हे) आणि उर्वरित विभागाकरीता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र 20 गुंठे (0.20 हे.) अशी मर्यादा राहील. एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळूण जास्तीत जास्त 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यासाठी फळपिकांचे उत्पादनक्षम वय पुढीलप्रमाणे राहील. आंबा, चिकू, काजू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 5 वर्षे, लिंबू फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 4 वर्षे, संत्रा, मोसंबी, पेरू, सीताफळ फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 3 वर्षे, डाळिंब, द्राक्ष फळ पिकासाठी उत्पादनक्षम वय 2 वर्षे, केळी, पपई, स्ट्रॉबेरी पिकासाठी  उत्पादनक्षम वय नाही. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल.

ही योजना पुढीलप्रमाणे कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येते .जळगावनांदेडहिंगोलीयवतमाळसिंधुदुर्गकोल्हापूरवर्धा आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लि.,  जालना जिल्ह्यासाठी फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.,  छत्रपती संभाजीनगरधाराशिव अमरावती,अकोलानागपूरपरभणीरायगडनंदुरबार जिल्ह्यासाठी युनिवर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. आणि ठाणेपालघरधुळेपुणेसांगलीलातूरबुलढाणानाशिकअहमदनगरसोलापूरसाताराबीडआणि वाशिम जिल्ह्यासाठी बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या कंपन्यांच्या माध्यमातून अधिसूचित जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

आंबिया बहार सन 2024-25 मध्ये फळपिक द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख ८० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १ लाख २७ हजार असून शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १५ ऑक्टोबर, २०२४ असा आहे.

मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. पपई पिकासाठी विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम १३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ असा आहे

संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ३३ हजार आहे. काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख २० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ४० हजार आहे. आंबा (कोकण) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे. गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ असा आहे.

आंबा (इतर जिल्हे) पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ७० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५७ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२४ असा आहे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम दोन लाख ४० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ८० हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ असा आहे.डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ६० हजार आहे.गारपीट या हवामान धोक्याकरता विमा संरक्षित रक्कम ५३ हजार आहे. शेतकऱ्यांनी योजनेमध्ये सहभाग घेण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२५ असा आहे.योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता सर्वसाधारण पणे विमा संरक्षित रकमेच्या ५% असतो.मात्र कमी जिल्ह्यात तो जास्त असू शकतो .

आंबिया बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निश्चित करण्यात आला आहे. अवेळी पाऊस, कमी /जास्त तापमान, वेगाचे वारे, गारपीट इत्यादी  निर्धारीत केलेले हवामान धोके (Weather Triggers)लागू झाल्यास विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होणार आहे.

योजनेत सहभाग करीता राष्ट्रीय पिक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in ) या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच आंबिया बहारात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी गारपीट (Add on Cover) या हवामान धोक्यासाठी राज्य शासनामार्फत विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील व याकरीता अतिरिक्त विमा हप्ता देय आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमीत व अतिरिक्त विमा हप्ता हा बँकांमार्फतच भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांनी अधिसुचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची तसेच त्यांना भरावयाच्या विमा हप्त्याची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजिकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक / वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा. आंबिया बहारातील अधिसुचित योजनेच्या अधिक माहितीसाठी सबंधित विमा कंपनीचे तालुका कार्यालय किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here