मुंबई, दि. ३: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय हा मराठी भाषेसाठी ऐतिहासिक असून आजचा दिवस सोनेरी दिवस असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने आभार मानताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवरसुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी भाषेच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात राज्यात मराठी विद्यापीठाची स्थापना, बोली भाषा विस्तार प्रकल्प, राज्यात वाचन चळवळ, पुस्तकांचे गाव, मराठी भाषा भवन असे अनेक निर्णय समाविष्ट आहेत. माय मराठीची पताका अशीच उंच फडकत राहील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
०००