छत्रपती संभाजीनगर,दि.६(जिमाका):- प्रशासकीय सेवेमध्ये मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी करावा. प्रशासनात सर्वसामान्यांच्या हितासाठी प्रामानिक सेवा देणे महत्त्वाचे असते,असे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक, औकाफ व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहांमध्ये निवृत्त सचिव तथा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या कार्यावर आधारीत व गौतम कोतवाल लिखित ‘जनमानसातील जिल्हाधिकारी’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.५) पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले.
विभागीय आयुक्त दिलीप गावडे ,जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, उपायुक्त जगदीश मिनीयार, डॉ.अनंत गव्हाणे, सुरेश बेदमुथा, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, एकनाथ बंगाळे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, हेमंत लांडगे, प्रसाद कोकीळ, घाटी रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ.वर्षा रोटे, माजी जिल्हाधिकारी तथा निवृत्त सचिव सुनील चव्हाण यांच्या पत्नी कांचन चव्हाण व परिवार तसेच प्रशासनातील अधिकारी कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
पालकमंत्री सत्तार म्हणाले की, सुनील चव्हाण यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी केलेले विविध क्षेत्रातील काम व योगदान हे उल्लेखनीय आहे. याची दखल शासन स्तरावर होणे आवश्यक आहे. लेबर कॉलनी येथील अतिक्रमण काढणे हे काम विशेष. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेली मदत. केशर आंबा निर्यात व बाजारपेठ उपलब्धतेसाठी केलेले प्रयत्न, क्रीडा विकासासाठी संथेटीक ट्रॅक,कृषी अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये जिल्ह्याला देशांमध्ये प्रथम क्रमांक, ऐतिहासिक वास्तूचे जतन व संवर्धन, अग्नीवीर सैन्य भरती यासह विविध क्षेत्रातील काम हे जिल्हा प्रशासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली, असे गौरवोद्गार श्री. सत्तार यांनी काढले. कोविड कालावधीमध्ये सुयोग्य नियोजनामुळे जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय ठरले.
आपले मनोगत व्यक्त करतांना सुनील चव्हाण म्हणाले की, जिल्हाधिकारी म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करताना सर्व प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी एक टीम म्हणून काम केले. समन्वय आणि सहकार्याच्या जोरावर विधायक आणि सकारात्मक गोष्टी करू शकतो, त्याचा अनुभव मी इथे घेतला. मराठवाड्याविषयी विशेष आपुलकी असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारीपदाचा कार्यकाळ माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तक स्वरूपातून केलेल्या कामाच्या नोंद या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे, वाचनातून माणूस समृद्ध होत जातो, तर वाचनासाठी पुस्तक खूप महत्त्वाची असल्याचे यावेळी त्यांनी विशेष नमूद केले.
सुनील चव्हाण यांचे सहकारी तथा प्रशासनातील विविध अधिकारी यात.विजय घोगरे डॉ. अनंत गव्हाणे उद्योजक,मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सय्यदा फिरासत. विविध क्षेत्रातील त्यांचे सहकारी यांनी यांच्या विषयी आठवणींना उजाळा दिला.
०००००