स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण

0
43
#image_title

नागपूर, दि. ६ – स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ या मल्टीमीडिया-शो च्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांचे विचार आणि जीवनकार्य युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

अंबाझरी येथील स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोचे लोकार्पण आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती संजय मीना आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री.गडकरी म्हणाले की, देश निर्मितीमध्ये युवांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत. हे विचार आणि त्यांचे जीवन कार्य या मल्टिमीडिया शोच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत विशेषतः शाळेतील मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न येत्या काळात करण्यात येणार आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये या शोचे आयोजन करण्यात येणार आहे. याच धर्तीवर अंभोऱ्यात भगवद्गीता आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित मल्टीमीडिया शोची निर्मिती करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या या प्रकल्पाला ‘स्वामी विवेकानंद : कहानी अनुभूती की’ असे नाव देण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित हा शो असणार आहे. कन्याकुमारीच्या स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आणि कोलकात्याच्या बेलूर मठावरुन स्फूर्ती घेऊन हा देखावा तयार करण्यात आला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला अंबाझरी येथील लाईट, साऊंड व मल्टीमीडिया शो आहे.   या शोचा आत्मा असलेले ध्वनी संयोजन ऑस्कर अवॉर्ड विजेते रसूल पुकुट्टी यांचे आहे. तर प्रकाशयोजना एमी अवार्ड विजेते सिनेमाटोग्राफर अलफोन्स रॉय यांची आहे. तर संजय वडनेरकर यांचे पार्श्वसंगीत आहे. हा देखावा ६९ फूट लांबीचा असून उंची ३४ फूट आहे. येथे ३०० प्रेक्षकांची आसन व्यवस्था देखील आहे.

०००

author avatar
Team DGIPR

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here