नाशिक, दि. ७ (जिमाका): येवला शहरातील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्यरत आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान बांधकाम व आरोग्य व रुग्णालय सुरक्षिततेच्या दृष्टीने अनुषंगिक सुविधांची कामे केली केली जाणार आहेत. यामुळे नागरिकांना वेळेत उपचार व उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
येवल्यासाठी बाभूळगाव येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निवासस्थान बांधकाम करणे व या रुग्णालय परिसरात संरक्षक भिंत, काँक्रिट रस्ता, अग्नीप्रतिबंधक उपाययोजना, सांडपाणी व्यवस्था, पावसाचे पाणी साठवण व अनुषंगिक कामांचे भूमिपूजन मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता किरण जाधव, हरीश जागळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमाकांत सोनवणे यांच्यासह आरोग्य कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, २००८ साली ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले होते. त्यानंतर २०२१ या वर्षी १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नागरिकांच्या सेवेत सुरू आहे. आज १४ कोटींच्या मंजूर निधीतून या रुग्णालयाच्या निवासस्थानाचे कामांचे भूमिपूजन झाले आहे. २० खाटांचे ट्रॉमाकेयर सेंटरसाठीही प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्याची जागा निश्चित करावी व काम सुरू करावे, कोविड काळात जिल्ह्यातील २७ ठिकाणी ऑक्सिजन यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. या यंत्रणा सुरळीत चालू राहण्यासाठी त्याचा नियमित वापर करण्यात यावा, अशा सूचना मंत्री श्री.भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
उपजिल्हा रुग्णालयासाठी टाईप २ मध्ये २४ निवासस्थाने व टाईप ३ मध्ये ४ निवासस्थाची एक इमारत साकरण्यात येणार आहे. तसेच एम २० दर्जाचे काँक्रिट पोचमार्ग, सांडपाणी व्यवस्था, लोखंडी दरवाजे, लोखंडी जिने, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध होणार असून ही कामे त्वरीत सुरू होणार असून येणाऱ्या काळात आवश्यक वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदेही भरली जातील व रूग्णालयासाठी आवश्यक सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
यानंतर मंत्री श्री. भुजबळ यांच्या हस्ते तालुका क्रीडा संकुल अतिरिक्त बांधकामाचे भूमिपूजन तसेच जुने तहसील कार्यालय येथे येवला महसूल अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने इमारत बांधकाम भूमिपूजन झाले. यावेळी तहसीलदार आबा महाजन, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, नायब तहसीलदार पंकज मगर, नगरपालिका मुख्य अधिकारी तुषार आहेर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या कामांचे झाले भूमिपूजन
- १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येवला निवासस्थाने बांधकाम (र.रु.१४०४ लक्ष)
- १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय येवला सांडपाणी व्यवस्था, संरक्षण भिंत, कॉक्रीट रस्ता (र.रु.१५० लक्ष)
- येवला तालुका क्रीडा संकुल अतिरिक्त बांधकाम-(र.रु.३०० लक्ष)
- येवला महसूल अधिकारी, कर्मचारी निवासस्थाने इमारत बांधकाम भूमिपूजन (र.रु.६५१ लक्ष)
०००