‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या प्रदर्शनाला मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई, दि. 7 : ‘सर्वस्पर्शी सरकार : दोन वर्ष महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची’ या शासनाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी भेट दिली.

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या प्रदर्शनाला यावेळी कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, कौशल्य विकास आयुक्त प्रदीप डांगे यांनीही भेट दिली. यावेळी चित्रकार नरेंद्र बोरलेपवार उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा यांनी प्रदर्शनात शासनाच्या विविध योजनांची माहिती घेतली तसेच कौशल्य विकास विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेल्या निर्णयांच्या दालनांबाबत समाधान व्यक्त केले. कौशल्य विकास विभागाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, महाराष्ट्र इंटरनॅशनल, रोजगार मिळावे, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिर, महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018, स्टार्टअप वीक, राज्यात संत गाडगेबाबा स्वच्छता अकादमीच्या सहा ठिकाणी झालेल्या स्थापनेसह विविध महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती प्रदर्शनात लावली आहे अशी माहिती चित्रकार नरेंद्र बोरलेपवार यांनी मंत्री श्री. लोढा यांना दिली.

राज्यात कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही मंत्री श्री.लोढा यावेळी म्हणाले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/