वाई विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण

सातारा, दि. 7 (जिमाका) : वाई मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. वाई मतदार संघातील विकास कामे तातडीन सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

याप्रसंगी खासदार नितीन पाटील, आमदार मकरंद पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत 62 कोटी 43 लाख खर्चाच्या लोणंद येथील पाणी पुरवठा योजनेचे, भोर अतिट खंडाळा लोणंद रस्त्याच्या 20 कोटी रुपयांच्या कामाचे, 62 कोटी 14 लाख रुपये खर्चाच्या वाई शहर नवीन पाणी पुरवठा योजनेचे, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) 2.0 अंतर्गत वाई शहरासाठी मलजल प्रक्रिया केंद्र बांधकाम व अनुषंगिक कामासाठी 22 कोटी 92 लाख खर्च करण्यात येणार आहे.

पोलादपूर-महाबळेश्वर – वाई-भाडळे- दहिवडी रस्त्याच्या सुधारणा करण्याच्या  कामाचे व पारगाव-यवत-सासवड-कापूरहोळ-भोर-मांढरदेव – वाई- सुरुर या रस्त्याच्या कामाचे भूमीपुजनही करण्यात आले. तसेच वाई शहरातील सोनगिरीवाडी येथील 4 कोटी 50 लाख खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, वाई नगरपरिषद हद्दीतील कृष्णा नदीवर 15 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले.