पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
चिंचवड महानगर पालिकेअंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमिपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जवळपास १ हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमिपूजन घेण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहूबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.
या शहरात सांस्कृतिकदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथे आयोजन करण्यात आले. आपली मातृभाषा मराठीचा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर प्रधानमंत्री यांनी अभिजात भाषेत समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले.
लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहराला योग्य दाबाने पुरेसे पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनीही वाहतूक शिस्त राखून सहकार्य करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच अन्य आवश्यक बाबी देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.
राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सर्व समाजघटकांना लाभ देण्याच्या दृष्टीने लाडकी बहिण योजना, मोफत ३ गॅस सिलेंडर, गरीब मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. तसेच शेतकऱ्यांसाठी वीजमाफीची योजना, दुधाला अनुदान देण्याची योजना, जन्माला आलेल्या मुलीला १ लाख १ हजार रुपये टप्प्या टप्प्याने देण्याची योजना, केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेंतर्गत देशात करावयाच्या ३ कोटी पैकी महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्यात येणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सर्व योजना सुरूच राहतील
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा होत असल्याने राज्याचा सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळतो. राज्याला आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे, अनावश्यक खर्च थांबविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, वस्तू व सेवा कर (जीएसटी), उत्पादन शुल्क आदी कराची रक्कम शासनाच्याच तिजोरीत यावी, नोंदणी शुल्काचे उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या कोणत्याही योजना थांबणार नाहीत, सर्व योजना चालूच राहतील.
चुकीचे प्रकार, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. या शहरात माय माता, मुली, बहिनी सुरक्षित रहाव्यात, चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी शहरात सीसीटिव्हीची नजर आहे. कोणतेही चुकीचे प्रकार, दहशत, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. मुली, स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींची सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार काम व्हावे, असेही ते म्हणाले.
माता रमाईंचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही
पिंपरी चिंचवड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पीएमपीएमएलच्या जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
विविध समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आदीवासी समाजाकरिता टार्टी संस्था, मातंग समाजाकरिता आर्टी, मराठा समाजाकरिता सारथी, इतर मागासवर्गीय समाजाकरिता महाज्योती, आर्थिक मागास समाजाकरिता अमृत संस्था, बंजारा समाजाकरिता वनार्टी, अल्पसंख्य समाजाकरिता मार्टी या संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून या समाजातील मुला-मुलींना शिक्षण, प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
याशिवाय अनेक समाजांकरिता वेगवेगळी महामंडळे काढलेली आहेत. अजून काही घटक समज राहिलेले असतील त्यांचाही यासाठी विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा टप्पा 1 चा शुभारंभ होत असताना नदीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असल्याने पुणे महानगरपालिकेलाही त्याचवेळी निविदा करण्यास सांगितले असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी होऊन चांगले काम होईल, असेही ते म्हणाले.
यावेळी प्रास्ताविकात आयुक्त श्री. सिंह यांनी पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. पूल, रस्ते, भुयारी मार्ग, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आदींबाबत माहिती दिली.
त्यापूर्वी श्री. पवार यांच्याहस्ते कळ दाबून विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पांची माहिती असलेली आणि आयसीसीसी प्रकल्पाच्या माहितींच्या चित्रफीती दाखविण्यात आल्या.
झोपडपट्टीधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी सदनिकांची चावी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. महानगरपालिका आणि सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वीच्या मुलींसाठी सुरू केलेल्या कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमांतर्गत मुलींना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले.