राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा बीड जिल्ह्यातील विविध घटकांशी संवाद

बीड दि. ९: राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज बीड जिल्हा दौऱ्यात शासकीय विश्रामगृह येथे लोकप्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्याशी जिल्ह्यातील विविध विकासविषयक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. तसेच उद्योग, संस्कृती, पर्यटन, साहित्य, माध्यम, उद्योजक तसेच विविध समाज घटकांशी संवाद साधून त्यांच्या जिल्ह्यांच्या विकासाबाबत असलेल्या अपेक्षा, अडचणी व संकल्पना जाणून घेतल्या.

यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार ॲड. उषा दराडे यांच्यासह विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने, जिल्हा पोलीस अधीक्षक  अविनाश बारगळ, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्यासह विविध विभागाचे प्रशासकीय प्रमुख उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांच्या समोर मान्यवर व्यक्तींनी  शेतकरी प्रश्न, सिंचन अनुशेष,  जिल्हयातील पायाभूत सुविधा. ‘उद्योगांसाठी पोषक वातावरण, ऊसतोड मजूरांचे स्थलांतर, आरोग्याच्या सुविधा, शहरातील पाणी प्रश्न यासारखे विषय मांडले.

बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूरांचे कामासाठी काही कालावधीसाठी स्थलांतर होते, त्यामुळे जिल्हयातच रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन भाषेचा गौरव करण्यात आला आहे. या मराठी भाषेतील प्रथम आद्य कवी हे बीड जिल्ह्यातील आहेत या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई येथे मराठी भाषेचे  विद्यापीठ व्हावे, बीड शहरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न सोडविण्यासोबतच कापूस उद्योगाला सहकार्य करावे. कापूस, सोयाबीनसह शेतीमालाला चांगला दर मिळावा, घरकुल योजना, शेतीसाठी वीज यासह विविध विषयावर चर्चागटात सहभागी मान्यवरांनी आपली मते मांडली. राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी विविध घटकातील मान्यवरांचे म्हणणे ऐकून घेत सर्व मागण्या व विकास संकल्पनांबाबत लक्ष घालण्याबाबत आश्वस्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध योजनांचे सादरीकरण केले. या बैठकीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्हयाचा ऐतिहासिक-सांस्कृतिक, भौगोलिक स्थिती व  उद्योग तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कामांबाबत माहिती दिली.