भारतीय उद्योजक जगताचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा हरपला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १०:  “उद्योगपती रतन टाटा हे भारतीय उद्योगक्षेत्राचा विश्वासार्ह, आश्वासक चेहरा होते. टाटा उद्योगसमुहाला आंतरराष्ट्रीय उंची, सन्मान, प्रतिष्ठा, विश्वासार्हता मिळवून देतांना देशाचा गौरव वाढवण्याचं काम त्यांनी केलं. सचोटी, प्रामाणिकपणाने उद्योग क्षेत्रात यश मिळवता येतं हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दाखवलं. संकटकाळात देशवासियांच्या मदतीला धावून येणारा, सामाजिक बांधिलकी जपणारा उद्योगसमुह म्हणून टाटा उद्योगसमुहाला देशभक्तीचं प्रतिक बनवण्यात ते यशस्वी ठरले. सर्वसामान्य भारतीयांचं कारचं स्वप्न त्यांनी ‘नॅनो’ कारच्या माध्यमातून पूर्ण केलं. टाटा उद्योगसमुहाचे संस्थापक नुसेरवानजी, जमशेटजी टाटा यांचा उद्योग, व्यापार, सामाजिक कार्य, देशभक्तीचा वारसा त्यांनी यशस्वीपणे पुढे नेला. प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रेम, आदर, आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या रतन टाटा साहेबांचं निधन ही भारतीय उद्योगजगताची मोठी हानी आहे. टाटा परिवार आणि रतन टाटा साहेबांच्या चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. रतन टाटा साहेबांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

०००