सिन्नर तालुक्यातील बंदीस्त पूर कालव्यांचा उपक्रम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

पूर कालव्यांच्या जलपूजनासह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

नाशिक, दि. ११ (जिमाका): बंदीस्त पूर कालव्यांच्या माध्यमातून नदीद्वारे वाहून जाणारे पाणी पूर चाऱ्यांद्वारे पाझर तलाव, बंधाऱ्यांमध्ये सोडण्याचे काम राज्यासाठी पथदर्शी ठरणार आहे. यामुळे दुष्काळी ठसा पुसला जाऊन सिन्नर तालुका जलयुक्त होणार आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज सिन्नर तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यानिमित्त पंचाळे येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे,  माजी खासदार देविदास पिंगळे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, कार्यकारी अभियंता उदय पालवे, जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी अजित कापडणीस, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, सरपंच सुनीता गडाख, माजी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमांतिनी कोकाटे  यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सिन्नर तालुक्यात आज बंदिस्त कालव्याच्या माध्यमातून १३० बंधारे, दोन पूर कालवे व पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्याचे काम होणार आहे. लासलगावात देव नदीवर या कालव्याचे काम करण्यात आले आहे. या कालव्यातून शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचणार असून शेतकरी सुजलाम सुफलाम होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होण्यासाठी उभारी मिळणार आहे. या कालव्यासाठी अंदाजे ३०० कोटी रुपये खर्च आला आहे. या पूरचारीच्या पाण्यामुळे जवळपास २०० पाझर तलाव तुडुंब भरले आहेत. तालुक्याचा दुष्काळ पूर्णपणे हटवण्यासाठी नदीजोड प्रकल्पावरही काम सुरू आहे. लवकरच त्याला मान्यता मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

९४० कोटी मंजूर  निधीतून १४८ किमी लांबीचा लासलगाव ते इगतपुरी रस्त्यांचे  काम होणार असून आज त्याचे  भूमिपूजन झाले आहे. या रस्त्यामुळे दळणवळणसह  विकासाला चालना मिळणर आहे. ५ कोटी निधीतून  निधीतून सोमठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन झाले आहे. ५ कोटो निधीतून शेतकरी ते थेट ग्राहक संकल्पनेवर आधारित बाजाराचे उद्घाटन झाले. याद्वारे शेतमाल योग्य प्रक्रिया करून  हा थेट ग्राहकांपर्यंत पोहचणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमाच्या बाबतीतही अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा करण्यात येत आहे.आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकासाठी २९१ कोटी रूपयांच्या आराखड्यास येणाऱ्या काळात मंजुरी घेण्यात येणार आहे. स्मारक ते कळसुबाई  शिखर या ठिकाणी रोप वे तयार करण्याचा मानस असून यामुळे पर्यटनास चालना मिळून आदिवासी बांधवांना रोजगाराच्या संधी उपल्बध होणार आहे. यासाठीही केंद्रं सरकार कडे मंजुरीसाठी  पाठपुरावा सुरू आहे. 44 लाख शेतकऱ्यांचे 15 हजार कोटी रूपयांचे वीज बील शासनाने भरून शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे. 1 ऑक्टोबर पासून  गाईच्या दुधाला रूपये 35 हमीभाव देण्यात आला आहे. शासकीय योजनांमध्ये अग्रेसर असेलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे ४६ हजार कोटी रुपयांचा निधीचा २ कोटी चाळीस लाख महिलांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. कांदा निर्यातबंदी उठवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन निर्यातबंदी उठवली. पिकांना चांगला बाजार भाव मिळवून देण्याची जबाबदारी आमची आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या निधीचेही काम लवकरच मार्गी लागणार असून जवळपास १४ ते १५ कोटींची विकासकामे लवकरच मार्गी लागणार आहेत. मागील दोन वर्षात तालुक्याच्या विकासासाठी ३ हजार ५०० हजार कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार श्री. कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य श्रीमती कोकाटे यांनी पूरचारीच्या कामांविषयी माहिती दिली.

या कामांचे भूमिपूजन

  • सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी सायाळे व खूप खोपडी मिरगाव पूर साऱ्याचे पूर कालव्याचे जलपूजन
  • ९४० कोटी रुपयांच्या निधीतून होणाऱ्या लासलगाव-विंचूर ते सोमठाणे, पंचाळे, पांगरी, मऱ्हळ, चापडगाव, हिवरे, पाडळी फाटा, ठाणगाव ते म्हैसवळण मार्गे इगतपुरी या रस्त्याचे भूमिपूजन
  • पंचाळे (उजनी) येथे ३ कोटी ६४ लाखांच्या निधीतून ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे भूमिपूजन पार पडले.

०००