मनोरा आमदार निवास समोरील चौकाचे उद्या विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण

मुंबई, दि. ११ : मनोरा आमदार निवास, नरीमन पॉईंट, येथील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात येणार आहे. विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४.०० वाजता विधानसभा अध्यक्ष आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या नामकरण निर्णयामुळे मातंग समाज बांधवांची गेल्या अनेक दिवसांची मागणी पूर्ण झाली असून या निर्णयाचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात येत आहे. मनोरा आमदार निवास समोरील चौकाला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी पूर्ण व्हावी यादृष्टीने विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. उद्याच्या या समारंभाची जय्यत तयारी सुरू असून सर्वांनी मनोरा आमदार निवास समोरील चौकात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अवघे ४९ वर्षांचे आयुष्य साहित्यरत्न अण्णाभाऊंना मिळाले, पण या अल्पकाळात त्यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारात विपुल लेखन केले. प्रतिकूलतेशी टक्कर देत जबरदस्त जीवन इच्‍छा व्यक्त करणाऱ्या व्यक्तिरेखा त्यांच्या साहित्यामध्ये दिसून येतात “जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मज भिमराव !” या त्यांच्या काव्यपंक्ती समताधिष्ठीत समाजरचनेसाठी आपल्याला लढण्याचे बळ देतात. “माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली…” महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपले गाव, कुंटुंब यांना दूरावत मुंबईत पोटापाण्यासाठी येणाऱ्यांच्या मनातील व्यथा अण्णाभाऊंनी या लोकगीतातून अतिशय नेमकेपणाने व्यक्त केली आहे. हे लोकगीत संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाप्रसंगी अनेकांच्या ओठावर होते. आपल्या लेखणी आणि वाणीने मराठी साहित्यविश्वात शोषितांचा आणि वंचितांचा आवाज बुलंद करणाऱ्या या महान लेखकास आणि समाजसुधारकास मी अभिवादन करतो, या चौक नामकरणामुळे आदरणीय अण्णाभाऊंची प्रेरणादायी स्मृती चिरंतन स्वरूपात जपण्यात येत आहे, अशी कृतज्ञ भावना विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.

०००

श्री. किरण वाघ/विसंअ/