सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक

सोलापूर, दि. १५ (जिमाका) :- सोलापूर जिल्ह्याचा विविध क्षेत्रात विकास करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. कृषी, सिंचन ,शैक्षणिक, औद्योगिक, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन क्षेत्रासह अन्य क्षेत्रात सर्वांगीण विकास घडवून आणून त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

           शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्या आढावा बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शितल उगले तेली, सोलापूर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस  अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

           राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सोलापूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी धरणासह विविध मोठे, माध्यम व लघु पाणी प्रकल्पाची माहिती घेतली. जिल्ह्यातील सिंचनाखालील क्षेत्राची माहिती घेऊन त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध पिकांविषयी जाणून घेतले. तसेच जास्तीत जास्त सिंचन सुविधा उपलब्ध केल्यास शेतकरी वर्गाला त्याचा लाभ मिळेल, असे त्यांनी सांगितले.

           जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची माहिती घेताना सर्वसामान्य रुग्णांसाठी शासकीय रुग्णालयामधील एमआरआय, सीटी स्कॅन मशीन, एक्स-रे यासह अन्य यंत्रणा व्यवस्थितपणे सुरू असली पाहिजे यासाठी संबंधित यंत्रणेने दक्षता घ्यावी. या मशीन वेळोवेळी दुरुस्त करण्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत रुग्णांना अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित अधिकारी वर्गाची असल्याचे निर्देश राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी दिले.

           पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या विकास कामांची माहिती घेतली. भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी सूचित केले.

          सोलापूर महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेताना उजनी धरणातून सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या कामाचाही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी आढावा घेतला. तसेच महापालिकेला करापासून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच पोलीस विभाग जिल्ह्यात शांतता ठेवण्यासाठी राबवत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती त्यांनी जाणून घेतली.

           प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याच्या विविध विकासात्मक कामाची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली. यामध्ये जिल्ह्याची सर्वसामान्य माहिती, कृषी, आरोग्य, सिंचन, पाणी प्रकल्प, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पर्यटन आराखडा आरोग्य, शैक्षणिक तसेच पारधी समाजाच्या वंचित नागरिकांना मतदार कार्ड वाटप आदी बाबत माहिती दिली. तसेच महापालिका आयुक्त श्रीमती उगले तेली यांनी हे महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध योजनांचे सादरीकरण यावेळी केले. शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी शहरी भागातील तर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. त्याप्रमाणेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यापीठाच्या वतीने राबवण्यात आलेले विविध अभ्यासक्रमाची माहिती सादर केली. तसेच विद्यापीठास शैक्षणिक उपक्रम राबवताना येत असलेल्या अडचणीची माहिती देऊन त्या सोडवण्याबाबत सहकार्य करण्याची मागणी केली.

याप्रसंगी उद्योजक, वकील, आय एम ए, संपादक व अन्य मान्यवरांशी संवाद साधला.