निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

निवडणूक संदर्भात कर्तव्याचा भंग; कर्मचारीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर, दि. १९ : विधानसभा निवडणुकीच्या कामांना गती देण्यात आली असून यात प्राथमिक टप्प्यात वय वर्षे ८५ पेक्षा अधिक ज्यांचे वय आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना व दिव्यांग मतदार असलेल्या मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. ही जबाबदारी सोपविण्यात आलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तथा सहाय्यक शिक्षक जयप्रकाश हेडाऊ यांनी अधिकृत कर्तव्याचे पालन न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल झाली. या तक्रारीअन्वये सावनेर येथील पोलीस स्टेशनमध्ये लोकप्रतिनिधीत्व अधिनियमान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावनेरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. रविंद्र होळी यांनी पो. स्टे. सावनेर येथे सदर तक्रार दाखल केली. नगरपरिषदेची सुभाष प्राथमिक शाळा, सावनेर येथील सहाय्यक शिक्षक जयप्रकाश जगरामजी हेडाऊ यांची यादी भाग क्रमांक १३५ करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणुन नेमणुक करण्यात आली होती. या क्षेत्राचे तलाठी तथा पर्यवेक्षक यांनी १२ ड फॉर्म भरून घेण्यास सांगितले असता हेडाऊ यांनी सदर काम करण्यास स्पष्ट नकार दिला. आदेश घेण्यास त्यांनी नकार दिला. अरेरावीचे असभ्य वर्तणूक केली. यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली होती.

निवडणूक कामाच्या आदेशाचे पालन करण्याच्या त्यांना वारंवार सूचना देवून त्यांनी आपल्या कर्तव्यात टाळाटाळ केली.  याबाबत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांनी समज देवून पाहिली. त्यांना वाजवी संधी देवूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे खलाटे यांनी सांगितले.

निवडणूक जबाबदारी आदेशाचे पालन न केल्यास कठोर कारवाई निवडणूक विभागातर्फे सुपूर्द करण्यात आलेली जबाबदारी ही राष्ट्रीय कर्तव्याचा भाग आहे. याच बरोबर कोणताही शासकीय कर्मचारी हा राजकीय प्रचारात सहभागी होता कामा नये. याबाबत निवडणूक विभागामार्फत स्वयंस्पष्ट आदेश निर्गमित केले आहेत. आपली जबाबदारी टाळण्यासाठी कोणीही आदेश रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास नियमानुसार कारवाई अटळ असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला.

०००