मतदारांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करा – जिल्हाधिकारी संजय यादव

मतदान केंद्रांवरील सोयी सुविधांचा आढावा

मुंबई, दि.१९ : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्हा प्रशासनाची मा.भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी सुरु आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकारी तथा अति. जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील सुविधांचा आढावा घेतला.निवडणूक संबंधितसर्व अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले की, मा. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, कचरापेटी, स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर तसेच रॅम्पची व्यवस्था, रांगांमध्ये गर्दी झाल्यास मतदारांना बसण्यासाठी खुर्ची किंवा बाकडे, मोकळ्या ठिकाणी मतदान केंद्र असल्यास मंडपाची उभारणी,पंखे आदी निश्चित किमान सुविधा यादृष्टीने नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व देखभाल दुरुस्त्या करुन घ्याव्यात. मतदान केंद्रावर ठळक अक्षरात येथील सुविधांचा फलक मतदार केंद्र क्रमांक, दिशादर्शक लावावेत. मा. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जेष्ठ नागरिकांमध्ये ज्यांचे वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे असे नागरिक व दिव्यांग मतदार यांच्यासह निवडणूक कर्तव्यानिमित्त नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगाने कार्यपद्धती विहित करुन दिली आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कोणताही मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहू नये, यादृष्टीने ८५ वर्षापेक्षा अधिक वय असलेले व दिव्यांग मतदारांना गृह मतदान करता येणार आहे. गृह मतदानासाठी नमुना 12-ड तत्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मतदार नोंदणी झालेल्या प्रत्येक मतदाराला सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी मतदार चिठ्ठ्यांचे वितरण  करावे व नागरिकांना मतदान केंद्राविषयी माहिती उपलब्ध करुन द्यावी. ज्या मतदारांचा संपर्क होत नाही त्यांना दूरध्वनी,एसएमएस,व्हाट्सअप  अशा माध्यमातून संपर्क करावा आणि मतदार केंद्राची माहिती दयावी. कोणत्याही प्रकारची मतदारांची गैरसोय होऊ नये. यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी. असे आदेशही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील परिसरातील विविध मतदान केंद्रांना भेटी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांना मतदान स्लीप मिळाली का? मतदान केंद्र कुठे आहे? याबाबत विचारणा केली. अनेक मतदारांनी जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्याशी संवाद साधला मतदानदिवशीचा अनुभव सांगितला त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकारी  तिथेच आवश्यक सूचना दिल्या. सर्व मतदान केंद्रांवरील संबंधित नोडल अधिकारी यांनामतदान जनजागृती उपक्रम विविध माध्यमातून राबवून मतदानांचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा,  असेही यावेळी सांगितले

आज दिवसभरात कुलाबा, मलबारहील, मुबांदेवी, वरळी, शिवडी आणि भायखळा या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी भेट दिली.

विद्यार्थ्यांकडून पालकांना मतदानासाठी संकल्पपत्र स्वीप अंतर्गत उपक्रम राबवा

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र भरून द्यावे, यातील संदेशामध्ये त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती द्यावी. लोकशाहीच्या मजबूतीकरणासोबतच मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन ऍण्ड इलेक्‍ट्रोरल पारर्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात यावा आणि शालेय विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेऊन  त्यांच्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करावा असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी यावेळी सांगितले.

०००