निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी केले मार्गदर्शन

  • मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम
  • गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर व्हा – जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. १९:  मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत सर्वच 26 विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूकविषयक प्रशिक्षण कार्यक्रम वेगात सुरु आहेत. 158-जोगेश्वरी, 167- विलेपार्ले व 168 चांदिवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत विभागीय अधिकारी व अन्य अधिकारी यांच्यासाठी निवडणूक कामकाज विषयक व ‘ईव्हीएम’ संदर्भातील प्रथम प्रशिक्षण मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे झाले.

173- चेंबूर आणि 167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील प्रशिक्षण कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मनोज गोहाड हे उपस्थित होते.

167- विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ क्षेत्र अंतर्गत निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास 672 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते तर 206 जण गैरहजर होते अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

मतदान केंद्र अध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी, व इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण यावेळी झाले. यावेळी हॅण्डस ऑन ट्रेनिंगची देखील व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

शिक्षणास तात्काळ हजर रहावे

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास तात्काळ हजर राहण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले आहेत.

गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले त्यांची माहिती संकलित करण्यात येत असून गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही श्री क्षीरसागर यांनी सांगितले आहे.

नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत विधानसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

०००