‘दिलखुलास’ कार्यक्रमात पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची २८, २९, ३०, ३१ ऑक्टोबरला मुलाखत

  • विधानसभा निवडणूक – २०२४

मुंबई, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आणि समाजमाध्यमांची भूमिका’ या विषयावर सायबर क्राईम विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ही निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी काटेकोरपणे नियोजन देखील करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीत ‘सायबर क्राईम विभागाची भूमिका आणि ही सर्व ‘माध्यमे हाताळताना घ्यावयाची काळजी’ याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. आचारसंहितेच्या काळात समाजमाध्यमांवरून कुठेही नियमांचे उल्लघंन होणार नाही तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स इत्यादी समाजमाध्यमांवरून आक्षेपार्ह पोस्ट, तथ्यहीन माहिती पसरवणे, निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणे इत्यादीबाबत कोणती नियमावली जाहिर करण्यात आली आहे, याबाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री. शिंत्रे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. शिंत्रे यांची मुलाखत सोमवार दि. 28, मंगळवार दि. 29, बुधवार दि. 30 आणि गुरूवार दि. 31 ऑक्टोबर 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

०००