मुंबई, दि. २५ : आयर्लंड देशाच्या निवडणूक आयोगातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातील राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी परिषद सभागृह येथे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
जगात सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. भारत निवडणूक आयोगाच्या अंतर्गत राज्य निवडणूक अधिकारी यांचे कार्यालय राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया काटेकोरपणे, नियोजनबद्धरित्या पार पाडत आहे. राज्यातील एकूण मतदार, मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा, मतदार जनजागृती आदींची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिली.
यावेळी आयर्लंड निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीमती मॅरी बेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी ऑर्ट ओ’लॅरी, महावाणिज्यदूत श्रीमती अनिता केली, आयरलँड दूतावासाचे अरमान श्रीवास्तव, राज्याच्या निवडणूक विभागाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी.प्रदीप, सहमुख्य निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड तसेच उपसचिव के.सूर्यकृष्णमूर्ती उपस्थित होते.
मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी भारत निवडणूक आणि राज्यातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांचे अधिकार व चालणारे कामकाज याविषयी माहिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेण्यात येतात. राज्याची लोकसंख्या, विधानसभा मतदार संघ, एकूण मतदान केंद्र, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र, बॅलेट युनिट ,कायदा व सुव्यवस्था, राजकीय पक्ष आणि आचारसंहिता, मतदान वाढवण्यासाठी राबवण्यात आलेले उपक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाचा निवडणूक प्रक्रियेत उपयोग करून विविध ॲप आणि पोर्टल आयोगाने विकसित केलेले आहेत, याबाबत सविस्तर माहिती यावेळी त्यांनी दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी, यासाठी आयरलँडच्या शिष्टमंडळांनी मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेला शुभेच्छा दिल्या.
०००