बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन

मुंबई, दि. २८ : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखातर्फे बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सन २०२४- २०२५ या वर्षात निबंधस्पर्धेसाठी विकसित भारत- ‘सन २०४७’,(Viksit Bharat-India in 2047, उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण (Public Policy for the Marginalized)आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्विमत्तेचा (AI) उपयोग(Use of Artificial Intelligence in Government) या विषयांवर निबंध सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

निबंध कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून सादर करावयाचा आहे. निबंध ३ हजार शब्दांपेक्षा कमी आणि ५ हजार शब्दांपेक्षा जास्त नसावा, निबंध हा विषयाच्या अनुषंगाने विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. निबंध कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर केवळ टोपणनांव लिहून चार प्रतीत २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सादर करावा.

स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये, निबंधाच्या प्रती व त्या सोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे नाव (मराठी व इंग्रजीतून); टोपणनाव, पत्ता, संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस नमूद करुन निबंधासोबत पाठवावे.

या स्पर्धेसाठी पहिले बक्षिस १० हजार रुपये, दुसरे बक्षिस ७ हजार ५०० रुपये, तिसरे बक्षीस ५ हजार रुपये, उत्तेजनार्थ बक्षिस दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत.

संस्थेस प्राप्त झालेल्या निबंधाच्या प्रती परत करण्यात येणार नाहीत. निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या प्रादेशिक शाखेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. योग्य त्या गुणवत्तेचा निबंध नसल्यास स्पर्धकास बक्षीस न देण्याचा किंवा बक्षिसाची रक्कम कमी करण्याचा अधिकार संस्था राखून ठेवीत आहे. बक्षीस देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्यावतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र ठरणार नाही.

टोपणनांव लिहिलेल्या निबंधाच्या चार प्रती व त्यासोबत वेगळ्या लिफाफ्यात स्पर्धकाचे संपूर्ण नाव (इंग्रजी व मराठी), टोपणनाव, पत्ता व संपर्क क्रमांक व ई-मेल अॅड्रेस लिहिलेली माहिती एकत्रित एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर ‘बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा, २०२४-२०२५’ असे नमूद करावे. हा लिफाफा ‘मानद अध्यक्ष, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळ मजला, बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला, मादम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई- ४०००३२’ या पत्त्यावर दिनांक २८/२/२०२५ पर्यंत पाठवावा. माहितीसाठी कृपया दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९ ३४३० किंवा ईमेल: js.mrb-iipa@gov.in द्वारे संपर्क साधावा.

0000

राजू धोत्रे/विसंअ/