मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरातीसाठी एमसीएमसी पूर्व प्रमाणिकरण अनिवार्य

मतदानाच्या दिवसापूर्वी व मतदानादिवशी काटेकोर निर्देश पालनाच्या सूचना

मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदान दिवसापूर्वी आणि मतदानादिवशी मुद्रित (प्रिंट) माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अडथळा येईल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नयेत, याबाबत मुद्रित माध्यम व सर्व संबंधितांना दक्षता घेण्याबाबत निर्देश दिले आहेत.

तसेच कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या मतदानादिवशी (दि. २० नोव्हेंबर २०२४) आणि मतदानाच्या एक दिवस आधी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) मुद्रित  माध्यमांत कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हा स्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (MCMC) पूर्व – प्रमाणित केली जात नाही, तोपर्यंत प्रकाशित करु नये, अशा सूचना दिल्या आहेत. तरी सर्व संबंधितांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी कळवले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/