जिल्हाधिकारी कार्यालयात ठाणेकरांकडून मतदानाची सामूहिक शपथ

ठाणे, दि. १४ (जिमाका):  भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांनी निवडणुकीत मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणेकरांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली मतदानाचा हक्क बजावण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली माने, नायब तहसिलदार स्मितल यादव, माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागातील अधिकारी-कर्मचारी, निवडणुककामी कार्यरत कर्मचारी तसेच ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळ तसेच एन. के. टी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नाविन्यपूर्ण आणि प्रभावी मतदार जागृती धोरणांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून, ठाणे जिल्ह्याने मतदारांचा सहभाग आणि नागरी सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले होते.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी ‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे, प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करु आणि मुक्त नि:पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करु’ ही प्रतिज्ञा सर्वांना दिली.

०००