मुंबई, दि. 9 : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे घेण्यात येणाऱ्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार दि. 26 मार्च, 2020 रोजी मतदान होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विधानभवनात 24 तास नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.
या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम दि.6 मार्चपासून सुरू झालेला आहे. नामनिर्देशन पत्र सादर करावयाची मुदत दि. 13 मार्च, 2020 पर्यंत आहे; आवश्यक असल्यास दि. 26 मार्च, 2020 रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने विधानभवनातील कक्ष क्रमांक 022, तळ मजला, विधानभवन, मुंबई-400 032 या ठिकाणी हा नियंत्रण कक्ष असणार आहे.
या निवडणुकीमध्ये मतदाराचे मत मिळवण्याच्या दृष्टीने त्याला रोख रक्कम किंवा वस्तू देऊन अनुचित प्रभाव निर्माण करणे, मुक्तपणे मताधिकार वापरताना मतदारांना कोणत्याही प्रकारच्या धमक्या देणे, जबरदस्ती करणे, मतदानामध्ये फायद्यासाठी राज्य यंत्रणेचा गैरवापर करणे, संबंधित मतदान अधिकारी, पोलीस अधिकारी यांची पक्षपाती वृत्ती किंवा अयोग्य वागणूक यांचा मतदानाच्या योग्यतेवर होणारा प्रतिकूल परिणाम आदींसंदर्भात तक्रार असल्यास नियंत्रण कक्षात सादर करावी, असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विलास आठवले यांनी केले आहे.
0000
सचिन गाढवे/वि.सं.अ./दि.9.3.2020