नागपूर,दि. १९ : भारत देश आणि राज्याच्या प्रगतीबरोबरच दैनिक भास्करने प्रगती साधत पत्रकारिता क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले. या वृत्तपत्राने नागपुरात वेगळे स्थान निर्माण केले असून नागपूरकर वाचकांना हे आपले वृत्तपत्र वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये आयोजित दै. भास्कर नागपूरच्या २२व्या वर्धापन दिनाचे मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री नितेश राणे, आमदार सर्वश्री कृपाल तुमाने, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दिकी, विकास ठाकरे, विश्वजित कदम, दै. भास्करचे प्रधान संपादक मनमोहन अग्रवाल, समुह संपादक प्रकाश दुबे, संचालक राकेश अग्रवाल, संपादक मणिकांत सोनी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, भास्कर म्हणजे सूर्य. सूर्य जसा सर्वत्र प्रकाश देतो तसेच देशात कुठेही गेलो तरी सकाळी सर्वत्र दैनिक भास्करचे दर्शन घडते. मुंबईतही कमी वेळात या वृत्तपत्राने स्वतःची छाप सोडली. हे वृत्तपत्र ज्या-ज्या ठिकाणाहून प्रकाशित होते तेथील संस्कृती, नागरिकांची आवड लक्षात घेवून वाचकांपुढे येते. दैनिक भास्करचा दांडिया उत्सव, गणेशोत्सवातील महालड्डू प्रसिद्ध असल्याचे सांगत या वृत्तपत्राने संपादकीय आणि व्यावसायिक विभाग पूर्णपणे वेगळा ठेवून कार्य केल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, दै. भास्करने 2002 मध्ये नागपूर येथून महाराष्ट्रातील आवृत्तीचा प्रारंभ केला. राज्यात या वृत्तपत्राच्या विविध आवृत्त्या सुरु झाल्या असून पत्रकारितेत या वृत्तपत्राने केलेले नवनवीन प्रयोग उल्लेखनीय आहेत.
विविध क्षेत्रात सेवाभावाने कार्य करणाऱ्या सात व्यक्तींचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कुंभमेळ्याच्या माहितीवर आधारित दै. भास्करद्वारा निर्मित ‘महाकुंभ प्रयागराज’ पुस्तकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते पार पडले.
०००