धर्म प्रचारासमवेत शिक्षण व आरोग्य क्षेत्रात समाधा आश्रमाचे अमूल्य योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर,दि.२१ : समाधा आश्रमाने सिंधी बांधवांना धर्माचे नैतिक अधिष्ठान दिले आहे. यासोबतच शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य आहे. आरोग्यासारख्या जनसेवेचा अनेक गोरगरिबांना लाभ होत आहे. भारताच्या फाळणीनंतर सिंधी समाजाने अनेक महानगरात येऊन आपल्या कर्तृत्त्वाच्या माध्यमातून भारताच्या समृध्दीसाठी दिलेले योगदान मोलाचे आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

नागपूर येथील पूज्य समाधा आश्रमाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जरीपटका येथील कार्यक्रमास लखनऊचे संत हरीशलाल, अयोध्या येथील नितीन साई, खटवारी दरबार मेकोसाबाग येथील संत फकीरा, संत सन्मुखदास उदासी, यांनी या समारंभास आशिर्वाद दिले. याचबरोबर आश्रामचे सेवाधारी कन्हैयालाल मन्धान, संजय बत्रा, दर्शन कुकरेजा, फतन गोपचंदानी, मोहन सचदेव, डिंपी जेसवानी, रवी टिलवानी,साधना सहकारी बँकेचे अध्यक्ष घनश्याम कुकरेजा, डॉ. रिंकी रुघवाणी, आदी मान्यवर उपस्थित होते.

आश्रमाच्या यज्ञकुंडासाठी सर्वांनी आपआपल्या परीने योगदान दिले पाहिजे. लोकांच्या सहभागातूनच पूज्य समाधा आश्रमाच्या लोकोपयोगी उपक्रमांना बळ मिळेल. आज बरोबर आठ वर्षापूर्वी म्हणजेच 20 डिसेंबर 2016 ला मला इथे आश्रमाशी जुळण्याची संधी मिळालेली आहे असा संदर्भ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन आश्रमाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सेवा है यज्ञकुंड, समिधा सम हम जलें। ध्येय महासागर में, सरित रूप हम मिलें।। या ओळी प्रत्येकाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. आपण प्रत्येकाने एखाद्या तरी सेवाभावी उपक्रमासमवेत जुळले पाहिजे याची शिकवण आपल्या समाधा आश्रमातून मिळते असे त्यांनी शेवटी सांगितले.

०००