विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाच्या लेखाजोख्यासह समतोल, सर्वांगिण, विकसित महाराष्ट्राचा आराखडा मांडला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशनात १७ विधेयके मंजूर

नागपूर, दि. २१ : नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ-मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह सिंचन, उद्योग, नदीजोड प्रकल्प, पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयांचा लेखाजोखा आणि विकसित, समतोल, सर्वांगिण महाराष्ट्राचा आराखडा मांडण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अधिवेशनात विविधांगी चर्चेच्या माध्यमातून १७ विधेयके मंजूर करण्यात आली असून जनसुरक्षा विधेयकाबाबत सर्वांना आपले म्हणणे मांडता येण्यासाठी हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर नागपूरच्या विधिमंडळ परिसरातील हिरवळीवर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारने विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासह शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. या अधिवेशनात मांडलेल्या ३५ हजार ७८८ कोटींच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजना यापुढेही सुरु ठेवण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आपत्ती बाधीत ५५ हजार संत्रा शेतकऱ्यांना १६५ कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कापसाला बोनस देण्यात आला आहे. सोयाबीनची विक्रमी खरेदी करण्यात आली असून १२ जानेवारीपर्यंत ही खरेदी सुरु राहणार आहे. बाजारात कापूस आणि तुरीचे खरेदी दर जास्त असल्याने शेतकरी आपला माल बाजारात विकत आहेत. विविध माध्यमांतून पिकांना सहाय्य करण्यासह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेबरोबर प्रकल्प करार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला ०.७२ टक्के व्याजदराने २० वर्षांसाठी ३५८६ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. ‘मित्रा’ संस्थेच्या माध्यमातून एक हजार लोकसंख्येवरील गावांना काँक्रीट रस्त्याने जोडणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण, बांबू अभियान यासारख्या उपक्रमांना देखील आशियाई विकास बँक मदत करणार आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील अडीच वर्षात सर्वासामान्य माणसांच्या आयुष्यात बदल घडविणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता आमची जबाबदारी आणखी वाढली असून सर्वसामान्यांच्या-मायभगिनींच्या प्रगतीसाठी, रक्षणासाठी यापुढेही एक टीम म्हणून काम केले जाणार आहे. या अधिवेशनात नागरिकांच्या, राज्याच्या चौफेर विकासाचा संकल्प करण्यात आल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले आहे.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई, संजय राठोड, आशिष जयस्वाल, नितेश राणे आदी उपस्थित होते.

०००