ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या निधनाने सामाजिक मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,दि.२३: सामान्यांचा संघर्ष, त्यांचे प्रश्न चित्रपटातून मांडणारे दिग्गज दिग्दर्शक पद्मभूषण श्माम बेनेगल यांच्या निधनामुळे सामाजिक बांधिलकी जपत चित्रपट निर्माण करणाऱ्या चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे आपल्या शोकसंदेशात म्हणतात, चित्रपटांमध्ये कोणताही धांगडधिंगा न दाखवता तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे दिग्दर्शक म्हणून श्याम बेनेगल यांची ओळख होती. त्यांनी चित्रपटांमधून मांडलेली कथा, मुद्दे हे खरंच विचार करायला लावणारे आणि सुन्न करणारे असायचे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अंकुर’ चित्रपटाची तर संपूर्ण जगाला दखल घ्यावी लागली होती. सामाजिक मुद्द्यांवर चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे भाष्य करणारा कलाकार चित्रपटसृष्टीने गमावला आहे.

त्यांनी केवळ चित्रपटच नाहीतर ‘भारत एक खोज’ सारखी मालिका केली होती या सगळ्याला अभ्यासकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. श्याम बेनेगल यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीत समांतर चित्रपटांची चळवळ सुरु करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं. त्यांच्या निधनामुळे समांतर सिनेमाचं युग पोरकं झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

॰॰॰॰