जळगाव, दि. 24 (जिमाका) : राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या क्लस्टर विकास कार्यक्रमात जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड झाली असल्याची घोषणा केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी केली. जळगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
भारताच्या फलोत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने क्लस्टर विकास कार्यक्रम अंतर्गत ५५ फलोत्पादन क्लस्टर विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. यातील प्रथम टप्यात संपूर्ण देशभरात १२ क्लस्टर पायलट प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे.
ज्यात जळगावची पायलट प्रकल्पासाठी निवड करण्यात आली आहे. जळगावची फलोत्पादन विकासातील क्षमता आणि श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या प्रयत्नांमुळे ही निवड शक्य झाली आहे.
क्लस्टर विकास कार्यक्रमाअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब, पायाभूत सुविधा उभारणी जसे की पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज आणि शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
जळगाव येथील पायलट प्रकल्प इतर क्लस्टरसाठी एक आदर्श ठरेल आणि फलोत्पादन क्षेत्रातील शाश्वत उपायांचा आदर्श निर्माण करेल. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि भारताला फलोत्पादनाच्या जागतिक निर्यातीत अग्रणी बनवण्याचे सरकारचे उद्दिष्ट या कार्यक्रमाच्या माध्यमातून साध्य होणार आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ व स्थानिक प्रशासन या प्रकल्पाच्या यशासाठी एकत्रित प्रयत्न करतील आणि जळगावला फलोत्पादन क्षेत्रातील प्रगतीचे एक उज्ज्वल उदाहरण बनवतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.