मुंबई, दि. 24: केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालय अंतर्गत भूसंपादन विभाग व महाराष्ट्र राज्यात मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 (PMKSY 2.0) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘पाणलोट यात्रेचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘पाणलोट यात्रेच्या’ माध्यमातून राज्यात पाणलोट विकासाची चळवळ उभारण्यात येईल असे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी मंत्रालयात मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी विभागातील विविध प्रकल्प, कामकाज आणि ‘पाणलोट यात्रेची’ अंमलबजावणी याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील, उपसचिव मृदुला देशपांडे, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी श्री.कलशेट्टी, मुख्य अभियंता विजय देवराज, अवर सचिव प्रकाश पाटील व देवेंद्र भामरे, याचबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे पोपटराव पवार आणि विविध संस्थांचे प्रमुख व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड म्हणाले की, राज्याला पाण्याच्या क्षेत्रात समृद्ध व शाश्वत उपाययोजना करण्यासाठी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. पाणलोट प्रकल्पांविषयी जनजागृती निर्माण करणे, थेट शेतकऱ्यांना या विषयाबद्दल शिक्षित करणे, तसेच लोकांमध्ये पाणलोट प्रकल्पांविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत ‘पाणलोट रथयात्रे’ चे आयोजन करण्यात येणार आहे. ही रथयात्रा जानेवारी 2025 मध्ये आयोजित केली जाणार असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून या योजनेविषयी व्यापक जनजागृती केली जाईल. या योजनेंतर्गत राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 140 प्रकल्प कार्यरत असून त्याचे क्षेत्र 5.65 लाख हेक्टर एवढे आहे. यासाठी केंद्र व राज्य शासन असे 60:40 यानुसार निधीचे प्रमाण असणार आहे. ‘पाणलोट रथयात्रे’ च्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाणलोट प्रकल्पांचे महत्त्व समजावून सांगण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावागावात जनचळवळ उभारून जनतेच्या सहकार्याने पाणलोट शाश्वत विकास होण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, अशा सुचनाही देखील यावेळी मंत्री श्री. राठोड यांनी यावेळी दिल्या.
यावेळी विभागाचे सचिव गणेश पाटील यांनी पाणलोट यात्रेची राज्यात कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येणार आहे याची माहिती दिली. या बैठकीत जलसंधारण क्षेत्रातील शाश्वत विकास, मृदा संरक्षण, जलसंपदा व्यवस्थापन आणि ग्रामविकास यासंबंधी योजनांवर चर्चा करण्यात आली.
000