जनसामान्यांच्या विश्वासाला जीवापाड जपेन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी समारंभात मुख्यमंत्र्यांचा सत्कार

नागपूर,दि. 25 : आजवर अनेक चढ-उतार राजकारणात अनुभवावे लागले. मला राजकारणात यायचे नाही हा सुरुवातीला माझा मनोदय होता. तथापि लोकसेवेचे ते एक माध्यम आहे हे माझ्या वरिष्ठांनी बिंबवून मला नगरसेवक पदाच्या निवडणुकीत उतरविले. कार्यकर्त्यांच्या बळावर मी निवडून आलो. महापौर झालो. आमदार झालो. मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. पुन्हा निवडून आलो. बहुमत असतांनाही राजकीय गणितांच्या गोळा बेरिजेमध्ये निराशा घ्यावी लागली. मला प्रत्येक क्षणी श्रद्ध्येय अटल बिहारी वाजपेयी यांचे हार नही मानुंगा हे शब्द प्रेरणा देत राहिले. आज पुन्हा कार्यकर्त्यांनी जी उत्स्फूर्त मेहनत घेतली, महाराष्ट्रातील मतदारांनी जो प्रचंड विश्वास दिला त्या विश्वासाच्या बळावर आज मला मुख्यमंत्री होता आले याची जाणीव असून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या विश्वासाला जीवापाड जपेन, असे भावोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्काराला उत्तर देतांना काढले.

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारोहात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारोहास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, राज्यमंत्री पंकज भोयर व विदर्भातील सन्माननिय आमदार उपस्थित होते.

आजवर नम्रतेने मी सत्कार टाळत आलो. मला नगरसेवक झाल्याची घटना आजही तेवढीच ताजी व कालच घडल्या सारखी वाटते. राज्यातील सर्व कार्यकर्त्यांनी स्वत:च्या रुपात मला पाहिले याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. यशाच्या पाठीमागे जनतेने टाकलेला विश्वास मला खुप मोलाचा वाटतो. या राज्यातील सर्व जनतेचा हा सत्कार आहे ही माझी भावना असून समाजातील प्रत्येक घटकाने दिलेला विश्वास सार्थकी लावेल असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले. हे यश राज्यातील सर्व कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे असून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

स्वकर्तृत्वावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासाला सार्थ केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

कोणत्याही सत्कारात भविष्यातील अपेक्षा दडलेल्या असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराण्याच्या जोरावर नव्हे तर त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीमुळे ते राजकारणात आले. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी प्रत्येक वेळी दिलेली जबाबदारी सार्थकी लावली या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फडणवीस यांच्या बद्दल गौरवोद्गार काढले.

अशांतता ही प्रगतिला मोठी अडसर असते. जगात एका बाजुला युक्रेन, इस्त्राईलसारखे देश युध्दामुळे अस्वस्थ आहेत. स्वाभाविकच ही अशांतता प्रगतीला खिळ घालणारी आहे, असे स्पष्ट करुन भारतातील धर्मनिरपेक्षतेला त्यांनी अधोरेखित करुन प्रत्येक विचारधारेला सन्मानाचे बळ देऊन त्यातील निरपेक्ष एकात्मता साधली पाहिजे असे आवाहन केले. आज भगवान गौतम बुध्द, प्रभू राम, कृष्ण,  अल्लाह, येशू ही एकच रुपे असून आमच्या नजरेत ती वेगळी नाहीत. अटलजींची धर्मनिरपेक्षता ही या व्यापक दृष्टीकोनातून आहे. या राज्यातील गोरगरिब, दिन-दुबळे, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, शेतकरी, कष्टकरी, कामगार या सर्वांनी विकासाच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी आपल्यावर असून त्यासाठी आपण सर्व कटिबध्द होऊ या असे गडकरी म्हणाले. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेला वाहते करणारे असून महाराष्ट्र सर्वांना सुसह्य कसा होईल याला प्राधान्य देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी महसूल मंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

00000