मुंबई, दि. 26 : येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, उपसचिव अनिल आहेर, उपसचिव शंकर जाधव, उपसचिव तुषार पवार, उपसचिव श्वेतांबरी खडे, संचालक (आयुष) डॉ. रामण घोंगळकर, कोल्हापूर जिल्ह्यातील आयुर्वेद महाविद्यालय कागल येथील अधिष्ठाता डॉ.वीणा पाटील व शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालय, उत्तूर महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत उपस्थित होते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सन २०२४-२५ पासून मुंबई आणि नाशिक येथे प्रत्येकी ५० विद्यार्थी क्षमतेचे आणि अंबरनाथ (जिल्हा -ठाणे), गडचिरोली, हिंगोली, वाशिम, अमरावती, बुलढाणा, जालना आणि भंडारा या जिल्हयांमध्ये प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्याबाबत तसेच प्रवेश प्रक्रियेतील अडचणी व उपाययोजनांबाबत PSU द्वारे होणाऱ्या बांधकामाचा आढावा घेतला.
यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सांगाव शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, कागल येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय, आजरा येथीय उत्तूर निसर्गोपचार महाविद्यालय संदर्भात आढावा घेण्यात आला. यंत्रसामुग्री निधी वितरण व पुनर्विनियोजनाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत तसेच 2024 – 25 मधील विविध योजनांचाही आढावा यावेळी घेण्यात आला.
0000
मोहिनी राणे/ससं/