मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून विविध विकासकामांचा आढावा

कोल्हापूर दि. 30 (जिमाका) : जलजीवन मिशन, राष्ट्रीय महामार्ग, प्रकल्पग्रस्त तसेच कागल येथील म्हाडा अशा विविध विषयांवर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंत्री मुश्रीफ यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचेसह संबंधित विभाग प्रमुख, तहसिलदार व प्रांत उपस्थित होते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयीनस्तरावर प्रलंबित असणाऱ्या विषयांबाबत पुढिल आठवड्यात बैठका लावणार असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आवश्यक प्रस्ताव व संबंधित गावातील प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे असे सांगितले.

आज झालेल्या बैठकीत मौ.चिमणे व उत्तूर, ग्रामपंचायत येथील जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांना वीजपुरवठा करणेबाबत चर्चा झाली. वीज बील थकबाकी मुळे वीजेचा पुरवठा थांबला असल्याचे वीज महामंडळाकडून सांगण्यात आले. जून 2022 नंतरची सर्व आवश्यक थकबाकी भरल्यानंतरच नवीन वीज जोडणी संबंधित ग्रामपंचायतीला देता येणार आहे. याबाबत गावाने पुर्तता करून चिमणे साठी 7 लक्ष व उत्तूरने 12 लक्ष रूपये वीजबील तातडीने भरुन योजना सुरु करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आंबेओहळ प्रकल्पातील प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत व आंबेओहळ प्रकल्पातील संकलन दुरुस्तीची (रिव्हीजन) अप्पर जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत चर्चा यावेळी झाली. यातील 5 जणांचे वाटप आदेश देण्यात आले आहेत. भूखंड वाटपाबाबत ज्यांचे 50 पॅकेज दिले आहे त्यांनीच आवश्यक बदलाचे तपशील सादर करावेत अशा सूचना देण्यात आल्या. यातील महसूल खात्याकडील प्रलंबित विषयाशी संबंधित बैठक मंत्रालयात लवकरच लावणार असल्याचे सांगितले.

कागल येथील गायरानमध्ये ख्रिश्चन दफनभूमीची जागा ख्रिश्चन समाजास हस्तांतरीत करणेबाबत चर्चा झाली. कागल येथील गट नं. ५४२ गायरान जमीनपैकी ०.२० गुंठे जमीन नगरपरिषद, कागल यांना म्युनिसिपल वापराकरीता देणेबाबत व कागल येथील गट नं. ३८५/अ गायरान जमीनपैकी ०.०८ गुंठे जमीन नगरपरिषद, कागल यांना म्युनिसिपल वापराकरीता देणेबाबत चर्चा झाली. याबातच नगरपालिका ठराव व आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. कागल ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे तसेच नवीन मंजूर असलेल्या उड्डाणपूल यांच्या कामाबाबतच्या दिरंगाई संदर्भात आढावा घेण्यात आला. दिरंगाई व सुरू असलेल्या कामामुळे नाहक त्रास लोकांना होत आहे अशी मागणी ग्रामस्थांनी मांडली. संबंधित विभागाकडून जून 2025 मुदत संबंधित ठेकेदारास दिली असल्याचे सांगितले. वेळेत आणि चांगल्या गुणवत्तेच्या कामाची ग्वाही संबंधित विभागाने बैठकीत दिली.

००००००